प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा खर्च

पुणे : विविध महात्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने आणि अंदाजपत्रकात अपेक्षित धरलेले उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता कमी असल्याने यंदा महापालिकेच्या अंदाजपत्रकात किमान दीड हजार कोटींची तूट येण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत ४ हजार ४०० कोटींचे उत्पन्न जमा झाले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील उत्पन्न उद्दिष्ट गाठण्यासाठी उर्वरित तीन महिन्यांत महापालिका प्रशासनाला धावाधाव करावी लागणार आहे.

दरम्यान, अंदाजपत्रकात तूट येणार असल्याचे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही स्पष्ट झाले असून अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही तूट दोन हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम अंदाजपत्रकावर होणार असून ते कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये

चालू आर्थिक वर्षासाठी (२०२२-२३) महापालिकेने ८ हजार ५९२ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर केले होते. उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होणार नसतानाही अंदाजपत्रक फुगविण्यात आल्याची टीका त्या वेळी करण्यात आली होती. मात्र आर्थिक वर्षाअखेरपर्यंत महापालिका उत्पन्नाचे उद्दिष्ट नक्की गाठेल, असा दावा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केला होता. मात्र महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या आढाव्यातच अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अंदाजपत्रकाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत महापालिकेला तीन हजार ३०० कोटींचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत मिळकतकर, वस्तू आणि सेवा कर आणि अन्य स्त्रोतातून १ हजार १०० कोटी असे एकूण ४ हजार ४०० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये मिळकतकरातून सर्वाधिक उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. या परिस्थितीत पुढील तीन महिन्यांत तीन हजार कोटींचे उद्दिष्ट महापालिकेला गाठण्यासाठी धावाधाव करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात सध्या मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरूज्जीवन आणि सुशोभीकरण योजना, राष्ट्रीय नदी सुधार योजना, उड्डाणपूल, नदीवरील पुलांची उभारणी, रस्ते विकसन असे विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिकेकडून करण्यात येत आहे. उत्पन्नाचे अन्य स्त्रोत नसल्याने मिळकतकर या पारंपरिक आर्थिक स्त्रोतावरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे उत्पन्नावरही मर्यादा आल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती असल्याने येत्या मार्च अखेरपर्यंत महापालिकेला ७ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा प्रशासकीय अंदाज आहे.

दरम्यान, उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यात महापालिकेला धावाधाव करावी लागणार आहे. मिळकतकराची वसूल, मिळकतकर थकबाकीसाठी मोहीम, शासकीय अनुदानासाठी पाठपुरावा, अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करून उत्पन्न वाढविणे असे पर्याय महापालिका प्रशासनापुढे आहेत. त्याला गती दिली जाईल आणि उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडूनही पाचशे कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

अंदाजपत्रकाचा ताळेबंद

अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दिष्ट- ८ हजार ५९२ कोटी

नऊ महिन्यांतील उत्पन्न- ४ हजार ४०० कोटी

आर्थिक वर्षाअखेर मिळणारे अपेक्षित उत्पन्न- ७ हजार ५०० कोटी

उर्वरित तीन महिन्यात मिळणारे उत्पन्न- ३ हजार कोटी