पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने विविध ठिकाणांवरील पार्किंग सुविधांचा विस्तार करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. त्याअंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील मल्टिलेव्हल पार्किंगची पुनर्बांधणी करून अधिक क्षमतेचे बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार पुढे आला आहे.

शहरातील अन्य प्रमुख भागांमध्येही ‘बांधा वापरा आणि हस्तातंरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर नवीन पार्किंग सुविधा उभारण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकारांना गुरुवारी दिली.

‘जंगली महाराज रस्त्यावरील सध्या बंद असलेले मल्टिलेव्हल पार्किंग पाडून त्या जागेवर अधिक वाहनक्षमतेचे आधुनिक बहुमजली पार्किंग उभारण्याचा विचार आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येचा आणि बदलत्या आकारमानाचा विचार करून नव्या पार्किंगची रचना करण्यात येणार आहे. विशेषतः मोठ्या वाहनांच्या उंचीचा विचार करून बांधकामाचे नियोजन केले जाईल,’ असेही भिमाले यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘मंडई, नारायण पेठ आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातही पार्किंग सुविधा वाढविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी बीओटी तत्त्वाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे महापालिकेला थेट आर्थिक खर्च करावा लागणार नाही. खासगी सहभागातून पार्किंग सुविधा उभारून त्याचे संचालन ठराविक कालावधीसाठी संबंधित संस्थेकडे देण्याचा पर्याय आहे.’

दरम्यान, ‘या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. अहवालातील शिफारशींनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे. शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर पार्किंग व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेची ही योजना महत्त्वाची ठरणार आहे,’ असा दावा भिमाले यांनी केला.