पुणे : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या १६९ जागांसाठी उद्या, (२५ जानेवारीला) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांबाबत उमेदवारांनी आक्षेप घेत परीक्षा रद्द करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने शुक्रवारी संध्याकाळी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. अपरिहार्य कारणामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून पुढील तारीख उमेदवारांना कळविली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी ही परीक्षा होणार होती. यासाठी सुमारे ४१ हजार २७३ परीक्षार्थींनी अर्ज केले आहेत. राज्यातील सहा महसूल विभागांंतील २० जिल्ह्यांमध्ये असलेल्या ६९ केंद्रांवर रविवारी २५ जानेवारीला ही परीक्षा घेतली जाणार होती. त्याची संपूर्ण तयारी देखील महापालिका प्रशासनाने पूर्ण केली होती. मात्र शुक्रवारी संध्याकाळी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने कळविण्यात आली.

यापूर्वी देखील महापालिका प्रशासनाने कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षा घेण्याचे नियोजन पूर्ण करून परीक्षेची तारीख देखील निश्चित केली होती. मात्र, नगरपरिषदांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही परीक्षा रखडली. ही परीक्षा कधी होणार अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून केली जात होती. महापालिका निवडणूका पूर्ण झाल्याने आचारसंहिता शिथिल करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने ही परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते.

महापालिकेने २०२२-२३ मध्ये विविध पदांसाठी ७४८ जागांची भरती केली. त्यानंतर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये ४१ हजार २७३ परीक्षार्थींनी अर्ज केले. एक डिसेंबर २०२५ रोजी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भरतीसाठी घेतली जाणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा २५ जानेवारी रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘आयबीपीएस’ या संस्थेमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार होती.

महापालिकेने ही परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ज्या उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते. त्यांनी आक्षेप घेतले होते. महापालिकेने ज्या केंद्रांवर परीक्षा देण्याची सोय केलेली होती. ती केंद्र चक्क १०० ते १५० किलोमीटर लांब अंतरावर असल्याची तक्रार केली जात होती. महापालिकेने विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता मनमानी पद्धतीने परीक्षा केंद्रांची निवड केल्याचा आरोपही परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून केला जात होता. ही परीक्षा रद्द करावी, अशी आग्रही मागणीही केली जात होती. यासाठी गेले दोन दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य भवनाच्या बाहेर आंदोलन देखील केले जात होते.