पुणे : शहरात पाण्याच्या टँकरची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी टँकरचालकांच ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. उन्हाळ्यात टँकरची मागणी वाढली असून, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘उन्हाळ्यात नागरिकांकडून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढते. अपघात टळावेत आणि वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून टँकरचालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी होणार आहे. टँकरचालक मद्य पिऊन तर कामावर आला नाही ना, हे तपासणे या चाचणीमुळे समजणार आहे.’
महापालिकेकडून सद्य:स्थितीत शहरातील विविध भागांत सुमारे १५०० टँकरद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय, ९० खासगी टँकरही नागरिकांची पाण्याची गरज भागविण्याच्या व्यवस्थेत सहभागी आहेत. शहरभरात आठ फीडर पॉइंटवरून दररोज अंदाजे १६०० टँकरमार्फत नागरिकांना पाणी दिले जाते.
भरधाव वेग, बेफिकीर वाहनचालक आणि काही वेळा मद्यपान करून वाहने चालविण्याच्या घटनांमुळे अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने पोलिसांच्या वाहतूक शाखेबरोबर चर्चा करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.
शहरातील कोणत्याही भागात पाण्याच्या टँकरमुळे अपघात होऊ नये, यासाठी सर्व टँकर फीडर पॉइंटवर (टँकर भरण्याच्या ठिकाणी ) चालकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’द्वारे तपासणी केली जाणार आहे. जे टँकरचालक मद्यपान केलेले आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून, संबंधित टँकरसेवाही तत्काळ बंद करण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख जगताप यांनी सांगितले. याशिवाय, टँकरचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबतही कडक सूचना दिल्या जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
अधिक माहिती देताना जगताप म्हणाले, शहरात टँकरचालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अपघातही वाढले आहेत. यामुळे पोलिसांच्या वाहतूक शाखेबरोबर चर्चा करून ‘ब्रेथ ॲनालायझर’ यंत्रे घेतली जाणार आहेत. फीडर पॉइंटवर टँकर भरण्यापूर्वी चालकाची ब्रेथ ॲनालायझर चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच त्याला टँकर चालविण्याची परवानगी दिली जाणार आहे.
येथे केला जातो टँकरने पाणीपुरवठा
शहरातील ज्या परिसरात महापालिकेला पाणीपुरवठा करणे अडचणीचे होते अशा भागातील नागरिकांना महापालिका टँकरने पाणीपुरवठा करते. यामध्ये महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या समावेश आहे. काही तांत्रिक कारणांमुळे महापालिकेला पाणीपुरवठा करण्यास अडचण आल्यास त्या भागातील नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणी देऊन नागरिकांची गरज भागविली जाते. यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. हे टँकर मोफत दिले जातात.
काही ठिकाणी नागरिकांना पाण्याची वाढीव आवश्यकता भासल्यास महापालिकेच्या माध्यमातून ठराविक शुल्क आकारून पाण्याचे टँकर दिले जातात. तर खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून देखील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळते. याचे दर किती असावेत हे महापालिकेने निश्चित करून दिलेले आहेत. शहरातील विविध भागात यासाठी टँकर पॉईंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
