पुणे : गर्भवती महिलांच्या आरोग्यसेवेत सातत्याने केलेल्या सुधारणा, उच्च जोखमीच्या गर्भधारणेवर विशेष लक्ष, वेळेत उपचार आणि सक्षम व्यवस्थेमुळे पुणे महापालिका क्षेत्रात मातामृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. २०२१-२२ मध्ये १०३ असलेली मातामृत्यूंची संख्या एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ६२ वर आली आहे. अवघ्या चार वर्षांत ३९ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांचे हे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार २०२१-२२ मध्ये १०३ मातामृत्यू झाले होते. त्यानंतर २०२२-२३ मध्ये हा आकडा ९० वर आला, तर २०२३-२४ मध्ये तो ८९ इतका राहिला. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मातामृत्यूंची संख्या आणखी कमी होऊन ६२ वर आली.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गर्भधारणेची सुरुवातीच्या टप्प्यात नोंदणी, नियमित प्रसूतीपूर्व तपासण्या, रक्तदाब, रक्तक्षय आणि मधुमेह यांसारख्या गुंतागुंतींचे वेळेवर निदान, उच्च जोखमीच्या गर्भवतींचे सातत्याने निरीक्षण आणि संस्थात्मक प्रसूतींना दिलेले प्रोत्साहन यामुळे सकारात्मक परिणाम दिसला आहे. याशिवाय, शासकीय व खासगी रुग्णालयांमधील समन्वय, अधिक सक्षम मार्गदर्शन व्यवस्था, अत्यावश्यक प्रसंगी तातडीने उच्चस्तरीय उपचारांची उपलब्धता, प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ आणि आधुनिक आरोग्य सुविधा यांचाही मातामृत्यू कमी करण्यात मोठा वाटा ठरल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मातामृत्यूची आकडेवारी

२०२१-२२ : १०३

२०२२-२३ : ९०

२०२३-२४ : ८९

एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ : ६२

मातामृत्यू रोखण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना

  • गर्भधारणेची पहिल्या तीन महिन्यांत नोंदणी आणि नियमित प्रसूतीपूर्व तपासण्या
  • सुरक्षित व संस्थात्मक प्रसूतींना प्राधान्य
  • उच्च जोखमीच्या गर्भधारणेचे लवकर निदान व विशेष देखरेख
  • रक्तक्षय, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे वेळेत निदान व उपचार
  • आयर्न-फॉलिक ॲसिड, कॅल्शियम आणि आवश्यक लसीकरण
  • गरजेनुसार सिझेरियनसह तातडीच्या प्रसूती सेवा
  • गुंतागुंत आढळल्यास तत्काळ उच्चस्तरीय रुग्णालयाची शिफारस
  • रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहतूक व्यवस्था
  • प्रत्येक मातामृत्यूचा सखोल आढावा घेऊन सुधारात्मक उपाययोजना