पुणे : पुण्याचा विस्तार चारही भागांना मोठ्या प्रमाणात होत असल्याने दिवसेंदिवस शहरातील हिरवाई कमी होत चालली आहे. मोठे गृहप्रकल्प, मेट्रो, नदी सुधार योजनांसह महत्वाचे प्रकल्प राबवण्यासाठी वृक्षतोड करावी लागत आहे. परिणामी शहरातील विविध भागातील गर्द झाडी कमी होत असल्याचे चित्र आहे.
पुणे शहर हरित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून महापालिका प्रशासन यासाठी प्रयत्नशील आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागांवर देखील हरित पट्टे निर्माण होऊ शकतात, असे मोठे वक्तव्य महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले आहे.
‘पुणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ‘ॲमिनिटी स्पेस’वर (मोकळ्या जागा) केवळ बांधकामेच केली पाहिजेत, असे अपेक्षित नाही. या जागांवर हरित पट्टे निर्माण होणेही आवश्यक आहे,’ अशी स्पष्ट भूमिका महापौर नागपुरे यांनी मांडली.
महापौर नागपुरे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी संपादकीय विभागातील प्रतिनिधींशी संवाद साधला. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या शहरीकरणाच्या प्रश्नांवर महापौर नागपुरे यांनी भाष्य केले.
शहराचा विस्तार चारही दिशांना होत असल्याने अनेक भागांत उंच इमारती उभारल्या जात आहेत. यामुळे एके काळी कोरेगाव पार्क, औंध, बाणेर या भागात असलेली हिरवाई कमी होत चालली आहे. शहरात नोकरी, शिक्षणासह व्यवसायाच्या निमित्त येणाऱ्या नागरिकांची गृहनिर्माणाची गरज भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे हरित पट्टे कमी होत असल्याकडे महापौरांचे लक्ष वेधले असता, त्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
महापौर नागपुरे म्हणाल्या, ‘नागरिकांची गरज भागविण्यासाठी मोठे प्रकल्प उभारले जात आहेत. शहरातील हरित क्षेत्र कमी होत आहे. मोठे प्रकल्प उभारल्यानंतर काही जागा ‘ॲमेनिटी स्पेस’ म्हणून महापालिकेला द्यावी लागते. महापालिकेकडे विविध भागांत मोठ्या संख्येने या मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. या जागांवर महापालिका बांधकामे करून तेथे प्रकल्प उभारते. आता मुळातच गेल्या काही वर्षांत शहरात बांधकामे वाढत असल्याने हिरवाई कमी होत आहे. त्यामुळे या ‘ॲमेनिटी स्पेस’मध्येही केवळ बांधकामेच केली पाहिजेत, असे नाही. उलट, महापालिकेच्या ताब्यात आलेल्या या मोकळ्या जागांवर हरित पट्टे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’
‘शहरात नदीसुधार योजना, मेट्रो तसेच इतर मोठे प्रकल्प उभारताना झाडे तोडली जातात. ही झाडे तोडताना न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून जेवढी झाडे तोडली जातात, त्याच्या ठरावीक पटींमध्ये झाडे लावली जातात. या झाडांची आवश्यक देखभाल केली जाते,’ असा दावा त्यांनी केला.
महापौर नागपुरे म्हणाल्या, ‘ॲमेनिटी स्पेस’मध्ये केवळ बांधकामेच केली पाहिजेत, असे नाही. उलट, महापालिकेच्या ताब्यात आलेल्या या मोकळ्या जागांवर हरित पट्टे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
