पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुढील काही महिन्यांसाठी १५ टक्के पाणीकपात करण्याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस बजाविली आहे. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीबचतीला प्राधान्य देण्यात येणार असल्याची भूमिका महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त हे येत्या शुक्रवारी (१० एप्रिल) जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असून, त्यानंतर पुण्यात पाणीकपात होणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
पाऊस सुरू होण्यास विलंब होण्याच्या शक्यतेने दर वर्षी ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणीसाठा राखीव ठेवला जातो. यंदा एल‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ३१ ऑगस्टपर्यंत राखीव ठेवण्याची सूचना उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जलसंपदा विभागाला केली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही त्याबाबत जलसंपदा विभागाला स्पष्ट सूचना केल्या आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि लगतच्या औद्योगिक क्षेत्राला ही नोटीस बजाविली आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रतिदिन १ हजार ५६० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेते. पुण्यात सध्या दररोज सुमारे १५६० दशलक्ष लिटर पाण्याचा वापर होत असून तो दरमहा अंदाजे १.६५ टीएमसी आहे. कपातीनंतर हा वापर १२०० ते १३०० दशलक्ष लिटरपर्यंत मर्यादित ठेवणे अपेक्षित असून मासिक वापर सुमारे १.३ टीएमसीपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे. कपातीचा निर्णय झाल्यास दरमहा सुमारे ४५० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होऊन पुढील चार महिन्यांत दोन टीएमसी पाणी बचतीचा दावा करयात आला आहे.
यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता असल्यामुळे १५ टक्के पाणीकपात करण्यासंदर्भातील नोटीस पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांना देण्यात आली आहे. त्यांच्याकडूनच त्याची अंमलबजावणी होईल. त्यानुसार पुढील काही महिन्यात दोन टीएमसी पाणीबचत करणे शक्य आहे. पाणीकपात न केल्यास येत्या काही दिवसांत कारवाई केली जाईल. – किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग
१५ टक्के पाणीकपातीसंदर्भातील पत्र मिळाले आहे. पाणीबचतीबाबत योग्य नियोजन केले जाईल. शहरातील दीड लाख अनधिकृत नळजोडातील होणारी पाणीचोरी तसेच गळती रोखण्यात येईल. वितरण वाहिन्यातील गळतीही रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासंदर्भात येत्या शुक्रवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात येईल. – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका
