पुणे : शहरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. यासाठी शहरातील ११ रुग्णालयांचे रुपांतर अत्याधुनिक रुग्णालयांमध्ये (मल्टिस्पेशालिस्ट) केले जाणार आहे. त्यामध्ये सहा प्रसूतिगृहे आणि पाच बाह्यरुग्ण विभाग असलेल्या रुग्णालयांचा समावेश आहे. त्यासाठी स्थायी समितीकडून सुमारे ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणावर आजही महापालिकेच्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत. शहरातील विविध भागांत महापालिकेचे ५४ बाह्यरुग्ण विभाग आणि १९ प्रसूतिगृहे कार्यरत आहेत.
या केंद्रांमध्ये दररोज सुमारे ११ ते १२ हजार रुग्ण उपचारासाठी येतात. अनेक रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता, अपुरी यंत्रणा तसेच प्रशासकीय विलंब यामुळे रुग्णांना सेवा देताना अडचणी निर्माण होतात. मंगळवार पेठेत असलेले कमला नेहरू हे एकमेव मोठे रुग्णालय महापालिकेचे आहे. यामध्ये विविध आजारांवर उपचार होतात. गेल्या काही वर्षांमध्ये शहराची वाढत असलेली लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता महापालिकेने इतर रुग्णालयांचे उन्नतीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
निवड करण्यात आलेली रुग्णालये
महापालिकेने पहिल्या टप्प्यात ११ रुग्णालयांची निवड केली आहे. यामध्ये येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालय, वडगाव येथील लायगुडे रुग्णालय, बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय, शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालय आणि गाडीखाना येथील मालती काची रुग्णालय यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, भवानी पेठ येथील सोनवणे प्रसूतिगृह, राजमाता जिजाऊ नर्सिंग होम, धनकवडी रुग्णालय, वानवडी येथील शिवरकर रुग्णालय, कोथरूड येथील सुतार रुग्णालय आणि बोपोडी येथील खेडेकर रुग्णालयाचा समावेश आहे.
पाहणीनंतर सविस्तर आराखडा
महापालिकेने निवडलेल्या या ११ रुग्णालयांमध्ये महापालिकेचे भवन तसेच विद्युत विभागामार्फत संयुक्त पाहणी केली जाणार आहे. या दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकारी या पाहणीत सहभागी होणार आहेत. या पाहणीनंतर या महापालिकेच्या रुग्णालयात आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, विद्युत व्यवस्था तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
