पुणे : महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यामुळे महापालिकेतील १३ अत्यावश्यक पदे भरली जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती.
परीक्षा घेऊन ही भरती केली जाणार असून, ही परीक्षा घेण्यासाठी केवळ ‘आयबीपीएस’ या संस्थेलाच प्राधान्य देण्यात आल्याने सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या विविध विभागांतील अत्यावश्यक १३ रिक्त पदे भरण्यासाठी ‘आयबीपीएस’ संस्थेमार्फत परीक्षा घेण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. हा प्रस्ताव मान्य झाल्याने ही पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊन प्रश्न उपस्थित केले. ‘महापालिकेचे नवीन भरती नियम अद्याप जाहीर का झाले नाहीत, भरतीची परीक्षा घेण्यासाठी ‘आयबीपीएस’ आणि टीसीएस या दोन्ही नामांकित संस्थांचे पर्याय उपलब्ध असताना केवळ एकाच संस्थेला वारंवार संधी का दिली जात आहे,’ अशी विचारणा त्यांनी केली.
यावर खुलासा करताना सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे म्हणाल्या, ‘यापूर्वीच्या तीन परीक्षा या ‘आयबीपीएस’मार्फत घेण्यात आल्या. त्यामुळे या संस्थेला प्राधान्य देण्यात आले.’ भरती नियम प्रक्रियेबाबत माहिती देताना उपायुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, ‘महापालिकेच्या भरती नियमांमध्ये काही तांत्रिक त्रुटी असून, त्या सुधारून आगामी सर्वसाधारण सभेत सुधारित नियम सादर केले जातील.’
‘आधी पदोन्नती, मगच भरती करा’
महापालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांना ज्या पदांवर पदोन्नतीची संधी उपलब्ध आहे, तिथे प्रथम पदोन्नती प्रक्रिया राबवावी आणि त्यानंतरच शिल्लक राहणाऱ्या रिक्त जागांवर सरळसेवा भरती घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी केली. महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा आणि हक्काचा विचार करणारी उपसूचना या वेळी मांडून मान्य करण्यात आली.
या १३ पदांची होणार भरती
भरती प्रक्रिये अंतर्गत वर्ग-१ ते वर्ग-३ मधील १३ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वर्ग एक मधील त्वचारोग तज्ज्ञ, एड्स मॉडेल अधिकारी, न्यूरोसर्जन, युरोसर्जन, रक्तसंक्रमण अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी यांचा, वर्ग २ मध्ये भूलतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी / उपनगरसचिव, तर वर्ग ३ मधील सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी, मत्स्यालय पर्यवेक्षक, / सहाय्यक या पदांचा समावेश आहे.
