पुणे : सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनगृहात स्वयंपाकासाठी चुली पेटवण्याची वेळ आली आहे. तसेच, जेवणाच्या थाळीतील खाद्यपदार्थ कमी करण्यात आले असून, दरवाढही झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.पश्चिम आशियातील युद्धामुळे सिलिंडरटंचाई गेल्या काही दिवसांपासून निर्माण झाली आहे.

त्याचा फटका विद्यापीठातील भोजनगृहांनाही बसत आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये पदवी, पदव्युत्तर, संशोधन अभ्यासक्रमांचे सुमारे ३ हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थी राहतात. या विद्यार्थ्यांना भोजनगृहाच्या माध्यमातून दुपारी आणि रात्री भोजन उपलब्ध करून दिले जाते. सिलिंडरटंचाई निर्माण झाल्यापासून भोजनगृहाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

खाद्यपदार्थांची संख्या कमी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सिलिंडर उपलब्धतेबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही सिलिंडरपुरवठा होत नसल्याने अखेरीस चुली पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.‘सिलिंडरअभावी भोजनगृहातील काही पदार्थ कमी करण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळी आणि रात्री केवळ डाळ-भात देण्यात आला.

तोही पोटभर नव्हता. जेवणासाठी तासभर रांगेत उभे राहवे लागते. आता विभागात शेवटचे काही महिने राहिले आहेत. संशोधन प्रकल्पांचे काम सुरू आहे. मात्र, भुकेमुळे अभ्यास करणेही शक्य नाही. विद्यापीठात राहणे अवघड झाले आहे,’ अशी भावना दीपक लांडे या विद्यार्थ्याने व्यक्त केली. ‘व्यवस्थित जेवण न झाल्याचा अभ्यासावर परिणाम होत आहे.

विभागात सुरू असलेल्या कामांमुळे गावी जाणेही शक्य नाही आणि विद्यापीठात जेवणाची व्यवस्था होत नाही असे दुहेरी संकट आहे,’ असे ऋतुराज चव्हाण या विद्यार्थ्याने सांगितले. ‘मुलींच्या वसतिगृहातही चुलीवर स्वयंपाक केला जात आहे. एक वेळच्या स्वयंपाकासाठी काही प्रमाणात गॅस वापरला जातो.

चुलीवरचे खायला मिळत असल्याने एरवी वसतिगृहाच्या खाणावळीत न येणाऱ्या मुलीही जेवणासाठी रांगा लावत आहे. अजून किती दिवस जेवण मिळेल, असा प्रश्न आहे. कुटुंबीयांकडून दररोज चौकशी केली जाते. काही मुली घरी परत बालावले जात असल्याचे सांगतात,’ असे सई पारशे या विद्यार्थिनीने नमूद केले.

कोट

विद्यापीठाच्या वसतिगृहासाठी सिलिंडर पुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे पुन्हा एकदा मागणी करण्यात येणार आहे.

  • डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ