पुणे : कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांनीच नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. चतु:श्रृंगीच्या टेकडीवरून जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, अभिमानश्री सोसायटीकडून बाणेर रस्त्याच्या दिशेने जाणारा नैसर्गिक नाला दस्तुरखुद्द जिल्हा पोलिसांनीच बुजविला असल्याचे समोर आले आहे. यामुळे अभिमानश्री व परिसरातील सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसांना तातडीने नोटीस पाठवा, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.

हा नाला बांधकाम करण्यासाठी पोलिसांकडून बुजविला जात आहे. त्यामुळे या परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापालिका आयुक्त राम यांनी पावले उचलली आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी या संदर्भात राम यांना निवेदन देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या भागात राहणाऱ्या सोसायट्यांमधील नागरिकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना येथील फोटो दाखविले.

स्थानिक नागरिकांनी दाखविलेले फोटो पाहिल्यानंतर महापालिका आयुक्त राम यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने जिल्हा पोलिसांना नोटीस काढण्याचे आदेश महापालिकेतील अधिकाऱ्यांना दिले. या बाबत अधिक माहिती देताना विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी सांगितले, की बाणेर रस्त्यावरील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातून वाहणारा नैसर्गिक नाला बुजवून त्या ठिकाणी इमारत बुजविण्याचे काम सुरू आहे.

या भागात मागील वर्षी पावसाळ्यात संबधित नाल्यात कचरा असल्याने नाल्यातील पाणी लगतच्या अभिमानश्री सोसायटी तसेच इतर सोसायट्यांमधील बंगल्यांमध्ये शिरले होते. या संदर्भात तक्रार केल्यानंतर महापालिका प्रशासनाने नाल्याची सफाई केली होती. नुकतेच जिल्हा पोलिसांनी नाला बुजवूनच बांधकाम सुरू केल्याने यंदाच्या पावसाळयात भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाल्याची पाहणी करायला गेलेल्या नागरिकांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली. आयुक्तांनी याची दखल घेतली असून या प्रकरणी तातडीने जिल्हा पोलिसांना नोटीस पाठविण्याचे आदेश पुणे महापालिकेतील विभाग प्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार आता ही नोटीस पाठवली जाणार आहे. जिल्हा पोलिसांना नोटीस काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले असून येत्या एक ते दोन दिवसात पोलिसांना ही नोटीस दिली जाईल. त्यावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार? याकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतलेल्या भूमिका नाला बजविण्याचे पोलीस विभागाने सुरू केलेले काम बंद केले जाणार का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.