पुणे : पुणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या ताब्यात जाणार, याचा फैसला सोमवारी झाला. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची निवड झाली. महापालिकेच्या सभागृहात अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यामध्ये भिमाले यांची बिनविरोध निवड झाली.

पुणे महापालिकेत सर्वाधिक जागा मिळवित दुसऱ्यांदा सत्ताधारी झालेल्या भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) पाहिल्या वर्षी अध्यक्षपदासाठी कोणाला संधी मिळणार याबाबत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून मोठी उत्सुकता होती. सुरुवातीपासूनच श्रीनाथ भिमाले यांच्यासह अन्य काही ज्येष्ठ नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. भाजपने महापौर पद सिंहगड रस्त्याला दिले. उपमहापौर पद बोपोडी भागात दिले. तर सभागृह नेते म्हणून गणेश बीडकर यांच्याकडे जबाबदारी देत कसबा विधानसभा मतदारसंघात संधी दिली. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी कोणत्या विधानसभा मतदारसंघाला मिळणार याबाबत तर्क वितर्क लावले जात होते.

गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये स्थायी समितीच्या सदस्यपदी भाजपने १२ सभासदांची निवड केली. यामध्ये आठ महिला सभासदांना तर चार नगरसेवकांना संधी दिली. स्थायी समितीमध्ये १६ पैकी १२ सभासद हे भाजपचे, तीन सभासद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तर एक सदस्य काँग्रेसचा आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष होणार हे निश्चित होते. भाजपने भिमाले यांना सदस्यपदी संधी दिल्याने तेच अध्यक्ष होणार हे स्पष्ट होते. त्याची औपचारिकता सोमवारी पार पडली.

भाजपकडून भिमाले यांनी अर्ज भरला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून सुहास टिंगरे यांनी अर्ज भरला होता. मात्र हा अर्ज भरताना एक मिनिट उशीर झाला होता. विभागीय आयुक्तांनी या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर अर्जाची छानणी झाली. त्यामध्ये टिंगरे यांचा अर्ज बाद करण्यात आल्याने भिमाले यांची निवड बिनविरोध झाली. भिमाले यांनी चार अर्ज भरले होते. तर टिंगरे यांनी एक अर्ज भरला होता.

विषय समित्यांची अध्यक्षपदाची निवडणूक २७ फेब्रुवारी ला होणार

महापालिकेचा डोलारा संभाळण्याची जबाबदारी स्थायी समितीवर असते. त्यामुळे सुरुवातीला स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यानंतर इतर विषय समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे.