पुणे : महापालिका प्रशासनाने नव्याने तयार केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेला महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे. एका विशिष्ट पक्षाला राजकीयदृष्ट्या फायद्याची ठरेल, अशी महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांची हद्द निश्चित केली आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून, क्षेत्रीय कार्यालयात येण्यासाठी चक्क १२ ते १३ किलोमीटरचे अंतर कापावे लागणार असल्याचा आरोप केला जात आहे.

नागरिकांना त्रासदायक ठरणारी ही प्रभागरचना बदलून पूर्वीप्रमाणेच क्षेत्रीय कार्यालयांची रचना करावी, अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षांच्या वतीने देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन दिवसांपूर्वी क्षेत्रीय कार्यालयांची रचना जाहीर केली. महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमुळे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत वाढ होणार असल्याचे निश्चित होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नव्याने रचना जाहीर केली आहे.

ही रचना करताना हद्दीलगतच्या प्रभागांचा समावेश जवळच्या क्षेत्रीय कार्यालयांत करण्यात आल्याचा दावा महापालिकेतील अधिकाऱ्यांनी केला असला, तरी यामध्ये तथ्य नसल्याचा दावा काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेवर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, महापालिकेतील विराेधी पक्षनेते नीलेश निकम यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळांची पुर्नरचना करताना प्रशासनाने अन्याय केला आहे. ही पुर्नरचना राजकीय हेतूने प्रेरित आहे. काही प्रभागांना पूर्वी जवळ असलेली क्षेत्रीय कार्यालये ही दूरच्या कार्यालयांना जाेडली गेली आहेत. यामुळे दैनंदिन कामासाठी नागरिकांना अधिक अंतराचा प्रवास करावा लागणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

‘महापालिका प्रशासनाने केलेली पुनर्रचना पाहता प्रशासनाकडून जाणीवपूर्वक ही रचना करण्यात आली आहे का, प्रशासन पुणेकरांसाठी काम करते की एका पक्षासाठी काम करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीत प्रभागरचना करताना प्रशासनाने ज्या पद्धतीने एका ठराविक पक्षालाच फायद्याची हाेईल अशी केली. त्याच पद्धतीने क्षेत्रीय कार्यालय आणि प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठराविक पक्षालाच फायदा हाेईल, अशा पद्धतीने क्षेत्रीय कार्यालयाची रचना करण्यात आली आहे,’ असा आरोप करण्यात आला. या बाबत महापालिका आयुक्त उपलब्ध नसल्याने अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन देण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेत बदल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. आयुक्त राम यांनी चुकीच्या पद्धतीने झालेल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या पुनर्रचनेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांप्रमाणेच काँग्रेसच्या सभासदांनीदेखील क्षेत्रीय कार्यालयाच्या रचनेवर आक्षेप घेतला आहे. एका पक्षाच्या फायद्यासाठी ही रचना करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नगरसेवक अविनाश साळवे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज यांची भेट घेऊन निवेदन दिले. प्रशासनाने याबाबत विचार न केल्यास आंदोलनाचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नीलेश निकम म्हणाले, महापालिका प्रशासन नि:पक्षपणे काम करत असल्याचे दाखवून देण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची पुर्नरचना तातडीने दुरुस्त करावी, नव्याने क्षेत्रीय कार्यालयांची रचना जाहीर करावी.