पुणे : शहरातील विविध भागांत पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या ‘व्हॉल्व्हमन’ना यापुढे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे लागणार आहे. पाणी सोडण्याच्या कामाची आवश्यक ती तांत्रिक माहिती असलेल्या व्यक्तीलाच हे काम दिले जावे हा यामागे उद्देश आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या ‘व्हॉल्व्हमन’ बाबत आलेल्या तक्रारींवर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. व्हॉल्व्हमन म्हणून काम करणाऱ्यांकडे प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना हे काम देण्यात येऊ नये, असे आदेश स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी दिली.
पाणी सोडण्यासाठी व्हॉल्व्हमन ठेकेदारांकडून घेतले जातात. यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाते. पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या व्हॉल्व्हमनसाठी महापालिका दीड ते दोन कोटी रुपयांच्या निविदा काढते. त्यानंतर त्यांची नियुक्ती होते. मात्र, आता त्यांच्याकडे व्हॉल्व्हमनचे प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना काम मिळणार नाही. तसेच, ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल अशा ठेकेदाराला त्याच्या कामाचे बिल देण्यात येऊ नये, असे आदेश प्रशासनाला दिल्याचे भिमाले यांनी सांगितले.
पाणी सोडण्यासाठी व्हॉल्व्हमन नेमण्याचे काम एकाच ठेकेदाराला न देता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय याची निविदा काढावी, त्यानुसार काम दिले जावे, अशा स्पष्ट सूचनाही प्रशासनाला दिल्याचे भिमाले यांनी सांगितले. त्यांचे प्रमाणपत्र तपासून ठेकेदाराला बिल द्यावे, अशा स्पष्ट सूचना केल्याचे भिमाले यांनी सांगितले.
निर्णय कशासाठी?
पाण्याची वाढत असलेली मागणी आणि पाणी सोडताना ‘व्हॉल्व्हमन’ कडून होणारा मनमानी कारभार थांबविण्यासाठी स्थायी समितीने हे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेतही अनेक सभासदांनी व्हॉल्व्हमन म्हणून काम करणाऱ्यांची मुजोरी किती असते, याचे दाखले सभागृहात देऊन त्यांना बदलण्याची मागणी केली होती. सकाळी केवळ दोन तास पाणी सोडण्याचे काम केल्यानंतर दिवसभर इतर कामे व्हॉल्व्हमन म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती सर्रास करतात. दोन तासांचे २० ते २५ हजार रुपयांचे वेतन त्यांना मिळते. तसेच, काही भागांतील नागरिकांकडून पैशांची मागणीदेखील त्यांच्याकडून केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे केल्या जात होत्या.
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, शहरातील विविध भागांत पाणी सोडण्यासाठी नियुक्त केल्या जाणारे व्हॉल्व्हमन तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना प्रमाणपत्राचे बंधन घालण्यात आले आहे. प्रमाणपत्र नसेल, तर संबंधित ठेकेदाराला बिल दिले जाणार नाही.
