पुणे : शहरात उन्हाळा वाढल्याने आता पाण्याची मागणी देखील वाढण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील काही भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांची गरज भागवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अतिरिक्त टँकर दिले जात आहेत. ‘शहरातील काही भागांमध्ये महापालिकेच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

हा पाणीपुरवठा करताना टँकरचालक तसेच टँकरमालकांनी नागरिकांकडून पैशांची मागणी करू नये. पाण्याच्या टँकरसाठी पैसे मागितल्यास नागरिकांनीदेखील त्यांना पैसे देऊ नयेत,’ असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी हे आवाहन केले आहे. ‘जे टँकरचालक तसेच टँकरमालक नागरिकांकडून पैसे घेतील त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल,’ असा इशाराही जगताप यांनी दिला आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने शहराच्या काही भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिकेच्या वतीने पाणी देण्याची जबाबदारी असलेले टँकरचालक, मालक संधीचा फायदा घेऊन नागरिकांकडे पाण्याच्या टँकरसाठी पैशांची मागणी करतात. काही नागरिक गरजेपोटी पैसेही देतात. मात्र, अनेक ठिकाणी यामधून वाद होतात. या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी आल्या आहेत.

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप म्हणाले, ‘टँकरचालक अथवा मालकांनी पैशाची मागणी करू नये. नागरिकांनीही त्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांकडे टँकरचालक अथवा मालकांनी पैसे मागितल्यास पाणीपुरवठा विभागाकडे ९६८९९००००२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पुराव्यांसह फोटो पाठवावा.’

अधिक माहिती देताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख जगताप यांनी सांगितले की, महापालिकेच्या वतीने दिले जाणारे टँकर हे मोफत असतात. त्यासाठी महापालिका कोणतेही शुल्क घेत नाही. टँकरचालकांनीदेखील नागरिकांकडून शुल्क घेऊ नये. जे टँकरचालक, मालक पाण्याच्या टँकरसाठी नागरिकांकडून बेकायदा पद्धतीने पैसे घेतील त्यांच्यावर पाच हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली जाईल.

समाविष्ट गावासह उपनगरातून टँकरची वाढती मागणी

पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये तसेच शहराचे उपनगर अशी ओळख असलेल्या कात्रज, आंबेगाव पठार, कोंढवा, विमान नगर लोहगाव धानोरी बाणेर, धायरी या भागातून विशेषतः पाण्याच्या टँकरची मोठी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाण्याची मागणी देखील वाढण्यास सुरुवात झाली आहे.

अपुऱ्या दाबाने आणि अनियमितपणे होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेत चार वर्षांनी निवडणुका होऊन लोकप्रतिनिधी निवडून गेले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बाबत नगरसेवकांच्या कार्यालयात देखील तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.