पुणे : महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत नालेसफाईची कामे सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने आतापर्यंत ३० ते ४० टक्के नालेसफाईची कामे पूर्ण केली आहेत. तर, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे ९० टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ढोले पाटील रस्ता आणि विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अवघी ५ ते ६ नालेसफाईची कामे झाली आहेत.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी शहरातील पावसाळी पूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्यामध्ये नालेसफाईच्या कामांची माहिती घेण्यात आली. शहरात सुमारे ३५० किलोमीटर लांबीचे नाले आणि ५०० किलोमीटर लांबीची गटारे आहेत. यापैकी बहुतांश नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने आणि गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, माती साठल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण होते. यामुळे प्रत्येक पावसाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचते.
हा प्रकार टाळण्यासाठी पालिकेकडून दर वर्षी एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये शहरातील नालेसफाईची कामे केली जातात. ही कामे करताना कल्व्हर्ट बांधणे, पावसाळी पाण्याची लाईन टाकणे, रस्त्यांवरचे खड्डे बुजविणे, ड्रेनेजची दुरुस्ती करणे, ज्या भागात पावसाळ्यात पाणी शिरते, अशा धोकादायक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन अशा कामांचे नियोजन केले जाते. दर वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचणारी १२० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. तेथे आवश्यक कामे सुरू आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत १५ ठिकाणी कामे सुरू आहेत. सहा ठिकाणी ३० मे पर्यंत कामे केली जाणार आहेत. ९ ठिकाणी कामे सुरू करण्यास विविध अडचणी येत आहे. त्यामुळे तेथे तात्पुरती कामे केली जाणार आहेत, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत काैर यांनी सांगितले.
निविदांना स्थायी समितीची मंजुरी न घेता कामे सुरु
महापालिका प्रशासनाने निविदा काढण्यास उशीर झाल्याचे कारण पुढे करत पावसाळी कामांच्या निविदा स्थायी समितीत मंजूर होण्याआधीच शहरात नालेसफाई, तसेच पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची कामे प्रशासनाने सुरु केली आहेत. या निविदा अद्यापही स्थायी समितीच्या मान्यतेसाठी आलेल्या नाहीत.त्यामुळे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला अंधारात ठेवत तब्बल ४५ कोटींच्या कामांना सुरुवात केली का ? अशी विचारणा केली जात आहे.
नदी, नाले तसेच पावसाळी गटारांची स्वच्छता करण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये या कामांच्या निविदा ८ ते ५२ टक्के कमी दराने येतात. त्यामुळे खरंच कामे होतात का, असा संशय निर्माण होतो. या वर्षी निविदा मंजुरी करण्याआधीच कामाला सुरुवात झाल्यामुळे या मागचे नक्की गौडबंगाल काय, हे उघड होऊ शकले नाही.
