पुणे : महापालिकेच्या मिळकतकर विभागाने पहिल्या तीन महिन्यांतच १ हजार ३९५ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. गेल्या पाच वर्षांतील पहिल्या तिमाहीतील सर्वाधिक करसंकलन यंदा झाले आहे. ७ लाख ४० हजार २८२ मालमत्ताधारकांनी मिळकतकर भरला असून ऑनलाई च्या माध्यमातून मिळकतकर भरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

महापालिकेचे आर्थिक वर्षे एप्रिलपासून सुरू होते. पहिल्या तीन महिन्यामध्ये जून अखेरपर्यंत निवासी मालमत्तांमधून ६ लाख १५ हजार ३५२ मालमत्ताधारकांनी ६८८.१९ कोटी रुपयांचा कर भरला आहे. बिगरनिवासी मालमत्तांमधून ८७ हजार ५९६ करदात्यांकडून ५६७.०२ कोटी रुपयांचे उत्पन्न, तर मोकळ्या भूखंडांमधून ४५.३८ कोटी रुपये, मिश्र स्वरूपाच्या मालमत्तांमधून ९५.२७ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे.

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्या तीन महिन्यामध्ये मिळकत कर संकलनात वाढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. २०२२-२३ मध्ये १,०७८.९७ कोटी, २०२३-२४ मध्ये ५३५.३२ कोटी, २०२४-२५ मध्ये १,३८८.७९ कोटी, २०२५-२६ मध्ये १,२९२.९४ कोटी, तर यंदा १,३९५.८६ कोटी रुपयांचे संकलन पहिल्या तीन महिन्यांमध्ये झाले आहे.

मिळकतकर भरताना नागरिकांनी ऑनलाइन व्यवहारांना सर्वात अधिक पसंती दिल्याचे समोर आले आहे. एकूण ५ लाख ४१ हजार ५०० मिळकतदारांनी ऑनलाइन पद्धतीने ९२७.०२ कोटी रुपयांचा कर भरला. रोख स्वरूपात १ लाख २२ हजार ७६२ नागरिकांनी ११४.३८ कोटी रुपये, तर धनादेश तसेच डिमांड ड्राफ्टद्वारे ७६ हजार २० नागरिकांनी ३५४.४६ कोटी रुपयांचा मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.

सर्वांत अधिक महसूल झोन २ मधून जमा

महापालिकेच्या झोन क्रमांक २ मधून सर्वाधिक ३९२.४८ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. त्यापाठोपाठ झोन क्रमांक १ मधून ३७७.९३ कोटी, झोन क्रमांक ४ मधून २९२.२८ कोटी, झोन क्रमांक ३ मधून २०४.५७ कोटी आणि झोन क्रमांक ५ मधून ११७.८१ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. जीएमआर मालमत्तांमधून स्वतंत्रपणे १०.७९ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, मिळकतकर विभागाने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात १,३९५.८६ कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे. मागील वर्षाच्या पहिल्या तीन महिन्याच्या या तुलनेत हा कर सुमारे १०३ कोटी रुपयांनी अधिक आहे. मिळकत कर विभाग त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करतील.