पुणे : महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना स्वत:च्या निवासी मालमत्तेवर ३० टक्के मिळकतकरात सवलत मिळते, असा मेसेज समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) विशेषत: व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात पाठविला जात आहे. मात्र हा मेसेज खोटा असून ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. हा निर्णय कोणत्याही अधिकृत शासन निर्णयावर आधारित नाहे, असे पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील कोणत्याही महानगरपालिका किंवा नगरपरिषद स्तरावर ज्येष्ठ नागरिकांना सरसकट ३० टक्के मालमत्ता कर सवलत देण्याबाबत कोणताही शासन निर्णय सध्या अस्तित्वात नाही. तसेच या प्रकारची कोणतीही राज्यस्तरीय योजना देखील राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेच्या मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळकतकरात ३० टक्के सवलत देण्यात येत असल्याचा मेसेज पाठविले जात आहेत. यावर महापालिका प्रशासनाने हा खुलसा केला असून नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उप आयुक्त रवी पवार यांनी नागरिकांना याबाबत आवाहन केले आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या अप्रमाणित मेसेजवर नागरिकांनी कोणताही विश्वास ठेवू नये. मालमत्ता कर सवलती संदर्भातील अचूक माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या जवळच्या संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. दरम्यान, सोशल मीडियावर पसरत असलेली ही माहिती दिशाभूल करणारी असल्याने नागरिकांनी असे मेसेज पुढे पाठवू नयेत तसेच अफवांपासून सावध रहावे, असे आवाहन देखील पवार यांनी केले आहे.
महापालिका कोणाला देते ५ ते १० टक्के मिळकतकरात सवलत
महानगरपालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाच्या वतीने चालू आर्थिक (२०२६-२७) या वर्षातील मिळकतकराची बीले तयार करण्यात आली असून त्याचे वाटप सुरु झाले आहे. जे नागरिक ३१ मे २०२६ पर्यंत मिळकतकर भरतील त्यांना सर्वसाधारण करामध्ये ५ ते १० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. या मुदतीत मिळकतदारांनी महापालिकेचा संपूर्ण मिळकत कराचा भरणा केल्यास त्यांना ही सवलत मिळणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या मिळकतकर भरणा केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या http://propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना मिळकतकर भरता येणार आहे. याबरोबरच नागरिकांच्या सोयीसाठी बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक आणि कॉसमॉस बँक यांच्या माध्यमातून देखील नागरिकांना मिळकतकर भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे (सीएफसी) सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मिळकतकर भरण्यासाठी सुरू राहणार आहेत.
