पुणे : पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प १५ हजार कोटींच्या घरात गेला आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे शहराचे क्षेत्रफळ देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेकडे उपलब्ध असलेले कर्मचारी, अधिकारी वर्ग यांची संख्या कमी आहे. मागील काही वर्षांपासून महापालिकेत नोकर भरती न झाल्याने अनेक पदेही रिक्त आहेत.
महापालिकेत रिक्त असलेल्या पदांचा गैरफायदा घेत महापालिकेत नोकरीला लावतो असे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांचे लाखो रुपयांची फसवणूक करत असल्याचे प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पालिकेत नोकरीच्या निमित्ताने उमेदवारांचे फसवणूक करण्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाचे तक्रार थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेत झालेल्या या कथेत भरती प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
महापालिकेत कंत्राटी पद्धतीने तसेच कायमस्वरूपी अशा कोणत्याही प्रकारची नोकरभरती करताना यापुढील काळात प्रत्येक आदेशावर ‘क्यूआर कोड ’ देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने होत असलेल्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
‘येत्या ५ जून पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. नोकर भरतीच्या कोणत्याही आदेशावर क्यूआर कोड छापले जाणार आहेत. त्यामुळे फसवणूक टाळली जाणार आहे. प्रत्येकाला क्यूआर कोड स्कॅन करून आदेशाची सत्यता तपासता येणार आहे,’ असे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी बुधवारी सांगितले.
‘महापालिकेच्या बोधचिन्हाचा तसेच अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करून महापालिकेच्या सेवेत घेण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे प्रकार समोर आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. हे बनावट आदेश इतके हूबेहूब होते, की याची शहानिशा करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही वेळ लागतो. यापुढील काळात महापालिकेच्या कोणत्याही विभागात नोकरभरती करण्याच्या प्रत्येक आदेशाला क्यूआर कोड देण्यात येणार आहे. नोकरभरतीच्या कुठल्याही प्रस्तावाच्या फाईलचे अगदी पहिल्या टप्प्यापासून प्रशासनाच्या वतीने ट्रॅकिंग करण्यात येणार आहे,’ असे नायर यांनी सांगितले.
महापालिकेच्या कायम सेवेत काम करणाऱ्या सेवकांपेक्षा कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सेवकांची संख्या अधिक आहे. यामुळे अनेकदा महापालिकेकडे ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कामगारांना नोकरी लावण्याचे अमिष दाखविले जाते. महापालिकेत नोकरी मिळणार या आशेवर अनेक जण याला बळी पडतात. यातून लाखो रुपयांची फसवणूक होते. दोन वर्षांपूर्वी अशीच फसवणूक झालेल्या एका युवकाने आत्महत्या केली.
