पुणे : ‘पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र, त्यानंतरही उमेदवारांची नियुक्ती करण्याची घाई का करण्यात येत आहे,’ अशी विचारणा करून ही भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) केली.

‘कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांबाबत आंदोलन करण्यात आले. तसेच, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. मात्र, त्या वेळी प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी,’ अशी मागणी संघटनेचे महासचिव कृष्णा साठे यांनी केली.

‘अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी, तीन उमेदवारांसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे. भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घोटाळ्याची कबुली देण्यात आली असताना नियुक्तीचा आदेश देण्याची घाई करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत गैरप्रकार कसा झाला, त्यामध्ये कोणाची भूमिका होती, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी,’ अशीही मागणी साठे यांनी केली.

फेरपरीक्षा घेण्याची मागणी

कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घ्या, अशी मागणी शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी केली. ‘या प्रकरणात केवळ तीनच उमेदवार लाभार्थी असतील, असे नाही. ही प्रश्नपत्रिका आणखी किती उमेदवारांपर्यंत पोचली आणि त्याचा लाभ किती जणांनी घेतला, याची सखोल चौकशी करावी.

या परीक्षेच्या निकालावर उमेदवारांची नियुक्ती करणे योग्य नाही,’ असे भानगिरे म्हणाले. विद्यार्थ्यांनी पेपर फुटीचे पुरावे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते बाहेर पाठविणे आणि त्याचा गैरफायदा घेण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी तीन उमेदवारांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आला आहे.

भानगिरे म्हणाले की, “तीन उमेदवारांवर कारवाई झाली असली तरी या गैरप्रकाराची व्याप्ती त्यापेक्षा मोठी असण्याची दाट शक्यता आहे. हजारो विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन परीक्षा दिली आहे. पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण परीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे याच निकालाच्या आधारे इतर उमेदवारांना नियुक्त्या देणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हक्कावर अन्याय करण्यासारखे आहे. नियुक्त्या तात्काळ थांबवून संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना समान व निष्पक्ष संधी देण्यासाठी फेरपरीक्षा घेणे आवश्यक आहे.

या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत शिवसेना पुणे शहराकडे खात्रीदायक माहिती उपलब्ध असल्याचा दावा भानगिरे यांनी केला. या संदर्भातील पुरावे योग्य वेळी जनतेसमोर आणले जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा भानगिरे यांनी दिला.