पुणे : महापालिकेत वाढत असलेली वाहनांची संख्या लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका भवनाच्या आवारात दुचाकींना प्रवेश न देता केवळ चारचाकी वाहनांना प्रवेश देण्याचा प्रयोग राबविण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. यामुळे महापालिकेत कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली. दुचाकी वाहने आत सोडली जात नसल्याने अनेक नागरिकांनी मुख्य इमारतीसमोरील रस्त्याच्या कडेला वाहने लावली. मात्र, त्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने नागरिकांना अधिकच त्रासाला सामोरे जावे लागले.
महापालिकेत चार वर्षांच्या प्रशासकराजनंतर आता लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. महापालिकेत १६५ नगरसेवक निवडून आले असून कामानिमित्त त्यांच्याबरोबर महापालिकेत येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढणार आहे. महापालिकेचे मुख्य सभागृह सुरू झाल्यानंतर महापालिकेत येणाऱ्यांची संख्याही वाढतच जाणार आहे. त्याचा थेट परिणाम वाहनांच्या पार्किंगवर होणार आहे.
पार्किंगचा गंभीर होत असलेला प्रश्न सोडविण्यासाठी मुख्य इमारतीच्या आवारात आता कोणत्याही दुचाकी वाहनांना प्रवेश न देता केवळ चारचाकी वाहनांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून याची अंमलबजावणी सुरू करून दुचाकींना प्रवेश नाकारण्यास सुरुवात केली. यामुळे वाहनचालक आणि महापालिकेचे सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार खटके उडल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाने हा बदल करताना नवीन इमारतीतील तळमजल्यापैकी पहिल्या मजल्यावरील दुचाकीचे पार्किंग तसेच जुन्या व नवीन इमारतीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत दुचाकी लावण्यास मनाई केली. तसेच, जुन्या इमारतीतील दुचाकीचे ओपन पार्किंग केवळ महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित केले आहे. यालगत असलेल्या दुमजली पार्किंगमधील सर्वांत वरचे पार्किंग हे सर्वसामान्य नागरिकांसाठी राखीव ठेवले आहे.
महापालिका भवनाच्या नवीन इमारतीतील तळघर व दोन्ही इमारतींच्या मधील जागेत होणारे दुचाकी पार्किंग बंद केले आहे. त्यामुळे या परिसरात दररोज उभ्या करण्यात येणाऱ्या ५०० दुचाकींपैकी ३०० दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना विचारले असता ते म्हणाले, ‘महापालिका भवनच्या आवारातील वाहनांच्या पार्किंगबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. महापालिकेचे सभागृह सुरू झाल्यानंतर अनेक अडचणी समोर येणार आहेत. महापालिकेत येणारी वाहने आणि त्यासाठी आवश्यक असलेले पार्किंग ही बिकट समस्या आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना महापालिकेकडून करण्यात येणार आहेत.
महापालिका कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. तसेच, मेट्रो मार्गावरील कर्मचाऱ्यांना मेट्रोने महापालिका भवन येथे ड्युटीसाठी येण्यासाठी आवाहन करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या पार्किंग सुविधेस प्राधान्य देणण्याकरिता प्रशासन सर्व शक्यता तपासून नियोजन करण्याचा प्रयत्न करेल.
