पुणे : ‘शहरातील वाढत्या वायू प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या हद्दीतील सर्व काँक्रिट रेडिमिक्स (आरएमसी) प्लांट बंद करण्यात यावेत,’ असा प्रस्ताव स्थायी समितीला देण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी हा प्रस्ताव दिला असून, स्थायी समितीच्या पुढील बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘शहरातील अनेक रहिवासी भागांमध्ये सिमेंट काँक्रिट रेडिमिक्स (आरएमसी) प्लांट्स बेकायदा सुरू आहेत. त्यामुळे शहरातील वायू प्रदूषणाबरोबरच वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. ‘रहिवासी भागांमध्ये औद्योगिक स्वरूपाचे उपक्रम चालविणे नियमबाह्य आहे. आरएमसी प्लांट्समधून निर्माण होणारे सिमेंटचे सूक्ष्म कण आणि धूळ हवेत मिसळून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहेत. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता असल्याने हे सर्व प्लांट बंद करावेत,’ असे चरवड यांनी या प्रस्तावात नमूद केले आहे.
याशिवाय, या प्लांट्समुळे मोठ्या वाहनांची सततची वर्दळ वाढून वाहतूक कोंडी निर्माण होते, तसेच जीवघेणे अपघात घडत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. पर्यावरणीय नियम आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींचे उल्लंघन करून हे प्लांट्स सुरू असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून देतानाच महापालिकेच्या अतिक्रमण, बांधकाम आणि पर्यावरण विभागांनी संयुक्त कारवाई करून बेकायदेशीर आरएमसी प्लांट्स तातडीने लाखबंद करावेत आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच, सर्व प्लांट्सची परवानगी, पर्यावरणीय मंजुरी आणि झोनिंग नियमांची सखोल पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील प्रभावित भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेचे नियमित तपासणी करावी. तसेच, प्रदूषण आणि अपघातांच्या घटनांची चौकशी करून जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत. भविष्यात रहिवासी भागांमध्ये अशा औद्योगिक प्रकल्पांना परवानगी देऊ नये. – हरिदास चरवड, नगरसेवक, पुणे महापालिका
