पुणे : ‘गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ‘रंगवा इको बाप्पा’ उपक्रम राबविण्यात येणार असून, यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली,’ अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिका शाळांमधील दोन हजार विद्यार्थ्यांसाठी निसर्गपूरक गणेशमूर्ती संच खरेदी करण्यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली.

पुणे महापालिकेच्या शाळांमधील दीड हजार विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्याची मागणी प्रशासनाने प्रस्तावात केली होती. साहित्यामध्ये समोर हा प्रस्ताव आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि स्थायी समितीच्या सदस्या रूपाली धाडवे यांनी दीड हजारऐवजी दोन हजार विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्याची उपसूचना दिली. त्याला समितीने मान्यता दिल्याचे भिमाले यांनी सांगितले.

कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या तसेच शाडू मातीचे मिश्रण असलेल्या सात इंची गणेशमूर्ती, सहा रंग, दोन ब्रश, पॅकिंग आणि संचाची माहितीपत्रिका असा प्रत्येक संच असणार आहे. मध्यवर्ती भांडार खरेदी समितीने ११ जून २०२६ रोजी निश्चित केलेल्या दरानुसार एका संचाची किंमत १४०० रुपये आहे. त्यानुसार १५०० संचांसाठी २१ लाख रुपये खर्च येणार आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगविण्याचा अनुभव देण्यात येणार आहे. गणेशोत्सवात पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर वाढविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असेही भिमाले यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने पर्यावरण पूरक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सवाच्या काळातही विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबावा यासाठी महापालिका विशेष प्रयत्नशील असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी इको बाप्पा हा उपक्रम केला जाणार आहे.

शहराच्या प्रदूषणात वाढ

गेल्या काही वर्षांपासून शहराचा विस्तार चारही दिशांना होत असल्याने लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. परिणामी अनेक पायाभूत सुविधांवर ताण येत असून वाहनांची संख्या वाढल्याने हवेचे प्रदूषण वाढले आहे. शहरातून वाहणाऱ्या नदीमध्ये सांडपाणी सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण देखील वाढले आहे. गणेशोत्सव मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर केल्यास आणि या मूर्ती नदीमध्ये विसर्जित केल्यास नदीचा प्रदूषणात वाढ होते. हे टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने उत्सवाच्या काळात उपक्रम राबवले जातात. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीचा मूर्ती बनवण्यासाठी वापर करावा आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून दूर राहावे यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.