पुणे : महापालिकेच्या पाच शाळांचे खासगीकरण करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावा शिक्षण समितीपुढे न आणता थेट स्थायी समितीला देण्यात आल्यामुळे या प्रस्तावाचा फेरविचार करण्याची सूचना स्थायी समितीने महापालिका प्रशासनाला गुरुवारी केली. ‘शिक्षण समितीच्या माध्यमातूनच हा प्रस्ताव सादर करण्यात यावा,’ असे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या वेळी सांगितले.
महापालिकेच्या शिक्षण विभागाकडील रास्ता पेठेतील के. सी. ठाकरे विद्या निकेतन शाळा, भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळा, बोपोडी येथील कै. अनंतराव पवार शाळा, येरवड्यातील मातोश्री इंग्रजी माध्यम शाळा, कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी शाळा या ‘आकांक्षा फाउंडेशन’कडून सन २००७ पासून चालविण्यात येत आहेत. ‘आकांक्षा फाउंडेशन’ ही संस्था कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या पाच शाळा चालवीत होती. मात्र, विद्यार्थ्यांचा गणवेश, शैक्षणिक साहित्य, इमारतीमधील सुविधा, वीज देयके हा खर्च महापालिकेकडून करण्यात येत होता. मुख्याध्यापक, शिक्षक आणि अन्य मनुष्यबळाचा खर्च फाउंडेशनकडून केला जात होता. मात्र, या पाच इंग्रजी माध्यमांच्या शाळा पुढील नऊ वर्षांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला दिला होता. त्यासाठी सुमारे १०१.२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र हा प्रस्ताव शिक्षण समितीसमोर न आणता थेट स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर फेरविचार करुन शिक्षण समितीच्या मार्फत हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केली असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पाच शाळा चालविण्यासाठी आकांक्षा फाउंडेशन या खासगी संस्थेला प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष २५ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव होता. सुमारे ४ हजार ५०० विद्यार्थ्यांच्या आधारावर हा खर्च दर वर्षी ११ कोटी २५ लाख रुपये इतका होणार असून, नऊ वर्षांच्या करार कालावधीत महापालिकेवर १०१ कोटी २५ लाख रुपयांचे आर्थिक दायित्व येणार आहे. महापालिकेच्या तिजोरीवर एवढा मोठा भार पडणार आहे. याचा विचार करून त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. त्यामुळेच प्रस्तावावर फेरविचार करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.
