पुणे : संतांनी दिलेला समता, बंधुता, सेवा आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महापौर मंजूषा नागपुरे यांच्या पुढाकारातून महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेला ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ हा उपक्रम वादात सापडला आहे. या बाबतच्या पत्रक, जाहिरात फलकांवर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच स्थान दिल्याचे समोर आले.

शहरात पुणे महापालिकेच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जागोजागी उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्रांना स्थान देण्यात आलेले नाही. शहरातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून हे स्वागत फलक लावण्यात आलेले आहेत.

महापालिकेच्या वतीने झालेल्या या चुकीबाबत विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या वतीने स्वागतासाठी जाहिरात फलक लावले जात असताना त्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या छायाचित्रांना स्थान न देता महापौर नागपुरे यांनी राजशिष्टाचार पाळला नसल्याची टीका निकम यांनी केली. ‘सेवा वारी’ म्हणत महापौर राजकारण करीत असल्याचे निकम म्हणाले.

राज्यात भाजपबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष, शिवसेना (शिंदे) पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे या विषयावर भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी महापौरांना समज देऊन त्यांच्याकडून स्पष्टीकरण घ्यावे अशी मागणी निकम यांनी केली आहे. महापौर नागपुरे यांच्याकडून अनेकदा दुजाभाव दिला जातो. वारंवार मागणी करू देखील त्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

महापालिकेने यंदा आषाढी वारीच्या निमित्ताने ‘पुणे प्रथम-सेवावारी २०२६’ हा उपक्रम राबविला आहे. या अंतर्गत वारकरी भाविकांसाठी पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळांवर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद पथके, नियंत्रण कक्ष अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुणे शहरात मुक्कामी असल्याने त्यांच्या स्वागतामध्ये तसेच त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी सर्वपक्षीय सभासद काम करत आहेत. महापौर या शहराच्या प्रथम नागरिक असतात. त्यांना विविध विषयांवर सर्वाधिकार दिले जातात. मात्र केवळ बहुमत आहे आणि आपल्याला बोलणारे कोणी नाही. चुकीचे काम केले तरी चालून जाते, असे महापौर नागपुरे यांना वाटत असेल तर असे चुकीचे  पायंडे कदापी खपवून घेतले जाणार नाही. याबाबत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि नेत्यांकडे देखील तक्रार केली जाणार असल्याचे विरोधी पक्ष नेते निकम यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यावर खुलासा करताना महापौर नागपूर म्हणाल्या, महापालिकेचा जाहिरात फलकांवर दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांची छायाचित्रे तसेच नाव टाकणं आवश्यक होते. ही चूक झालेली आहे. मात्र हे जाणीवपूर्वक केलेले नाही. स्वागत फलकांवर फोटो नाही, हे आमच्या उशिरा लक्षात आले. संबधितांना या बाबत समज देण्यात आली आहे.