पुणे : शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमधील रस्ते झाडण्यासाठी सुरू असलेल्या कामाला स्थायी समितीने नऊ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या मुदतवाढीला ब्रेक लावला आहे. कामगिरीनुसार झाडकाम करणाऱ्या संबधित ठेकेदारांना तीन महिन्यांसाठीच मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानंतर एक वर्षासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील झाडकाम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामगिरीनुसार झाडकाम दिले होते. तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हे काम देण्यात आले. ३१ ऑक्टोबरपर्यंत संबधित ठेकेदारांना हे काम करण्याची मुदत होती. गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत झाडकाम करणाऱ्या ठेकेदारांना नऊ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा ठराव मान्य करण्यात आला.
मात्र, महापालिका प्रशासनाने या निर्णयाला ब्रेक लावून संबंधित ठेकेदारांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची भूमिका घेतली. या तीन महिन्यांत नव्याने निविदा प्रक्रिया राबवून पुढील एक वर्षासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, मुदतवाढीच्या निर्णयाला माजी नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने हा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला.
दरम्यान, कोणतीही निविदा न काढता संबधित ठेकेदाराला मुदतवाढ देण्याच्या या निर्णयाला कायदेशीर आधार नसल्याचा दावा माजी नगरसेवकांनी केला असून, याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रशासनाने सावध भूमिका घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
स्थायी समितीने एकदा मंजूर केलेला ठराव प्रशासनाला परस्पर बदलता येत नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाच्या नव्या भूमिकेमुळेही कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठेकेदाराची नाराजी बैठकीत का नाही दिसली ?
महापालिका प्रशासनाने १५ क्षेत्रीय कार्यालयातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी ज्या ठेकेदारांना काम दिले आहे. हे ठेकेदार व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार मागील तीन आठवड्यापासून नगरसेवकांकडून केली जात होती. ठेकेदाराने कामे करण्यासाठी कमी कर्मचारी नेमले आहेत. सकाळी तसेच संध्याकाळी प्रभागात कचरा असतो. कामे करताना ठेकेदारांची माणसे दिसत नाहीत. या ठेकेदारांना हे काम देण्याची आवश्यकता नाही. नव्याने निविदा मागविण्याची आवश्यकता आहे, अशा अनेक तक्रारी नगरसेवकांकडून केल्या जात होत्या. मात्र प्रत्यक्षात स्थायी समितीच्या बैठकीत यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. त्याऐवजी संबंधित ठेकेदारांना चक्क एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्याने त्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
