अशी रस्ते दुरुस्ती टिकणार का?

पुणे : पावसाने रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे महापालिका प्रशासनावर जोरदार टीका सुरू झाल्यानंतर महापालिके ने पावसात डांबरीकरणाची कामे सुरू केली आहेत. मात्र पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे होत असल्याने ती टिकणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पावसाळापूर्व रस्ते दुरुस्तीची कामे करताना आणि खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया अशास्त्रीय पद्धतीने झाल्याने रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. त्याचा त्रास नागरिकांबरोबर वाहनचालकांनाही सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांच्या विरोधात महापालिका प्रशासनावर टीका होत आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, असे आदेश सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. खड्डे पडलेल्या भागात डांबरीकरण करण्यात येत आहे. लक्ष्मी रस्त्यावर सध्या डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पावसाळ्यात रस्ते खोदाईला मान्यता दिली जात नाही. मात्र अद्यापही काही भागात विविध कारणांसाठी रस्ते खोदाई सुरू असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी के लेली रस्ते दुरुस्तीची कामेही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. काही ठिकाणी काँक्रिटीकरण तर काही ठिकाणचे डांबरीकरण महापालिके ने दुरुस्तीच्या नावाखाली के ले आहे. एकसंधता नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र टीका होत असल्याने घाईगडबडीने रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र पावसाळ्यातील होत असलेली दुरुस्तीची कामे टिकणार का, हा प्रश्न उपस्थित झाला असून नागरिकांच्या कराच्या पैशांचा अपव्यय या निमित्ताने होण्याची भीती आहे.