पुणे : शहरातील भटक्या श्वानांना पकडून त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यानंतर पुन्हा त्याच भागात न सोडता त्यांना निवारा केंद्रात ठेवले जाणार आहे. यासाठी पुणे महापालिका शिंदेवाडी, भूगाव आणि हडपसरमध्ये रामटेकडी येथे तीन निवारा केंद्रे (शेल्टर) उभारणार असून, त्यांमध्ये तीन हजार भटक्या श्वानांना ठेवणे शक्य होणार आहे.
‘भूगाव आणि शिंदेवाडी येथील निवारा केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील काही महिन्यांमध्ये येथे भटक्या श्वानांना ठेवण्याचा मार्ग मोकळा होईल,’ अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.पुणे शहरातील विविध भागांमध्ये भटक्या श्वानांचा त्रास दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
सकाळी फिरायला घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह शालेय विद्यार्थी, दुचाकीवरून जाणारे नागरिक यांच्यावर भटके श्वान हल्ला करतात. यामध्ये अनेकांना दुखापत होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून भटक्या श्वानांना पकडण्यात येते. त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करून या श्वानांना ज्या भागातून पकडण्यात येते, तेथेच परत सोडले जाते.
भटक्या श्वानांना पकडल्यानंतर पुन्हा तेथेच न सोडता त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. भटक्या श्वानांचा वाढलेला त्रास लक्षात घेता शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके, डेपो आणि रेल्वे स्थानकांमधून भटक्या श्वानांना तातडीने पकडण्याच्या सूचना न्यायालयाने राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार करून सर्व प्रादेशिक कार्यालयांकडून सार्वजनिक ठिकाणांची सविस्तर माहिती मागवली. प्राथमिक माहितीनुसार, शहरात ७६ महापालिका रुग्णालये, २१६ उद्याने, चार रेल्वेस्थानके, १४१ महापालिका शाळांच्या इमारती, १० सांस्कृतिक केंद्रे, बालेवाडी स्टेडियम आणि एक विमानतळ आहे.
मात्र, या सर्व ठिकाणी भटक्या श्वानांची संख्या नक्की किती आहे, हे निश्चित झालेले नाही.अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, भटक्या श्वानांसाठी महापालिकेच्या वतीने तीन निवारा केंद्रे उभारण्यात येत आहेत. शिंदेवाडी, भूगाव येथील निवारा केंद्राचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे भटक्या श्वानांना पकडल्यानंतर पुन्हा त्या भागात न सोडता, त्यांना निवारा केंद्रात ठेवले जाईल.
२५ कोटी रुपये निधीची तरतूद
राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका भटक्या श्वानावर दररोज अन्न, पाणी आणि स्वच्छतेसाठी सुमारे १०३ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या तीन श्वान निवारा केंद्रांत तीन हजार श्वानांच्या अन्न, वैद्यकीय उपचार व देखभालीचा एकत्रित खर्च लक्षात घेऊन आरोग्य विभागाने महापालिकेच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
