पुणे : शहरातून वाहणाऱ्या नदीच्या किनारी तसेच रस्त्यांवर आणि मोकळ्या जागामध्ये सर्रासपणे राडारोडा टाकला जातो. यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये महापालिकेला अपयश आल्याचे वारंवार समोर आले आहे. नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे महापालिका प्रशासनाने अनेकदा जाहीर केले होते. मात्र आत्तापर्यंत कोणावरही मोठी कारवाई झाली नव्हती.
महापालिका प्रशासनाने ठरवले तर काहीही अशक्य नाही हे गुरुवारी स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवार पेठेतील नदीपात्राजवळ मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकल्याचे समोर आले होते. महापालिका भवना पासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या जागेत हा राडारोडा टाकण्यात आल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका केली जात होती.
राडारोडा टाकण्यावरून होत असलेली टीका महापालिका प्रशासनाच्या जिव्हारी लागली. त्यानंतर नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याच्या सूचना आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्या. पोलिसांकडे तक्रार करत या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हे काम सुरू होते. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. मध्यरात्री नदीपात्रात राडारोडा कोणी टाकला याचा शोध घेण्यास महापालिका प्रशासनाला यश आल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.
नदीपात्रात बेकायदा राडारोडा टाकणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करून दहा लाखांचा दंड केला आहे. शिवाजीनगर तोफखाना येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून (एसआरए) हा राडारोडा आल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्यानंतर महापालिकेने संबधित विकासकाला काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यापुढील काळात सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांवर अशाच पद्धतीने कडक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शनिवार पेठेत नदीपात्रालगत बांधकामाचा राडारोडा टाकल्याचा प्रकार घडला होता. महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नदीपात्रात सर्रास राडारोडा टाकला जात असल्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात होती. या घटनेनंतर महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरांचे चित्रीकरण पाहून संबंधित विकासकावर कारवाई करण्यासाठी पावले उचलली. तपासानंतर विकासकाचे नाव समोर आले. त्यानंतर अशा प्रकारांना वेळीच आळा बसवा, यासाठी संबधित विकासकाचे काम तातडीने थांबविण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणावरून राडारोडा आला होता, तेथील साईट सील करण्यात आली. तसेच, संबंधित विकासकाला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. संबधिताविरुद्ध फौजदारी गुन्हादेखील दाखल करण्यात आल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
आयुक्त राम म्हणाले, ‘मुळा मुठा नदीपात्रात सर्रास राडारोडा टाकला जातो. हे प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. हे प्रकार रात्री सुरू होते. काही लोक बदलायला तयार नाहीत. यापुढील काळात कुणी असे कृत्य करत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राडारोडा कुठेही टाकला, तर त्याच्या मुळाशी जाऊन संबंधित सर्वांवर कारवाई केली जाणार आहे.
शांतिवन परिसरातदेखील मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकून नदीत सपाटीकरण केले आहे. घनकचरा विभागाने त्याला नोटीस दिली आहे. साधारण २० ट्रक माल आहे. ही कारवाई अधिक कडक करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

