पुणे : महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांवर मतदारयाद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), जनगणना अशी दुहेरी कामे सोपवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, शिक्षकांना बीएलओ आणि जनगणना असे दुहेरी काम टाळण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आदेश असतानाही महापालिकेकडून दुहेरी काम लावण्यात आल्याने शिक्षक मेटाकुटीला आले असून, शैक्षणिक कामकाजाव्यतिरिक्त आलेल्या दुहेरी कामाबाबत शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा, मूल्यमापन, निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. या नियमित शैक्षणिक कामांसह शिक्षकांना मतदारयाद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत केंद्रस्तरीय अधिकारी, जनगणनेचेही काम करावे लागत आहे. त्यातही अनेक शिक्षकांना त्यांच्या कार्यरत भागाऐवजी १५ ते २० किलोमीटर दूरच्या भागात जनगणनेचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने महिला शिक्षकांसाठी जनगणनेचे काम अडचणीचे ठरत आहे. काही शिक्षकांना जनगणनेसह मतदारयाद्यांच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून दुहेरी काम करावे लागत असल्याची माहिती महापालिका शाळांतील शिक्षकांनी दिली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ७ एप्रिल रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिलेल्या आदेशानुसार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागात फिरून मतदारांची माहिती घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे बीएलओ यांना जनगणनेची कामे दिल्यास मतदारसंघांतील निवडणुकीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बीएलओ म्हणून नियुक्त कर्मचाऱ्यांना जनगणनेची कामे न देण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे नमूद करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महानगरपालिका-नगरपालिका विभागाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष सचिन डिंबळे म्हणाले, ‘जिल्हाधिकारी यांनी दुहेरी नेमणुका टाळण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरही त्याचे तंतोतंत पालन होणे अत्यावश्यक आहे. शिक्षकांना जनगणनेचे काम त्यांच्या कार्यरत विभागातच द्यावे, शैक्षणिक कामकाजाच्या काळात दुहेरी नेमणुका त्वरित रद्द कराव्यात. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.’
जनगणना कार्यालय आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यात या बाबत चर्चा झाली आहे. जनगणनेचे कामकाज १६ मे नंतर सुरू होणार आहे. तर ‘बीएलओ’चे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे दुहेरी कामकाजाबाबत दोन्ही कार्यालयाकडून निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी केली जाईल. -विजय लांडगे, शहर जनगणना अधिकारी, पुणे महापालिका
.
