पुणे : शहरातील धोकादायक झालेले वाडे आणि जुन्या इमारती तातडीने रिकामे करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाने महापालिका आयुक्तांकडे मान्यतेसाठी ठेवला आहे. वाडे रिकामे करण्यासाठी आवश्यक ती मदत द्यावी, असे पत्र महापालिका आयुक्तांकडून पोलीस आयुक्तांना पाठविले जाणार असून, त्यानंतर पोलीस बंदोबस्तात ३७ धोकादायक वाडे रिकामे करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
शहरातील मध्यवर्ती पेठांच्या भागात असलेल्या वाड्यांचे सर्वेक्षण महापालिकेने केले होते. त्यामध्ये ३७ वाडे धोकादायक असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित वाडा मालकांसह भाडेकरुंना नोटीस देत वाडे रिकामे करण्यास सांगितले आहे. मात्र, या ३७ वाडा मालक, भाडेकरूंनी याला विरोध करून स्थलांतरीत होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वाडे रिकामे करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे ठरविले आहे. याबाबतचा बांधकाम विभागाने प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये अनेक जुने वाडे आहेत. हे वाडे धोकादायक झाल्याने तेथे राहण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. या वाड्यांमध्ये जागा मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद आहेत. तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने भाडेकरू तेथून निघण्यास तयार नाहीत. धोकादायक वाडे असतानाही तेथे नागरिक राहत असल्याचे महापालिकेने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. पावसाळा असल्याने धोकादायक झालेल्या इमारती तसेच वाडे कोसळून दुर्घटना होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने वाडे मालकांना नोटीस देत जागा रिकामी करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, महापालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी यंदाच्या वर्षी शहरातील ११६ धोकादायक झालेल्या वाड्यांना नोटीस दिली होती. त्यापैकी ७६ वाड्यांचा धोकादायक झालेला भाग काढून टाकण्यात आला. तर काही ठिकाणी डागडुजी करण्यात आली. मात्र, ३७ वाड्यांतील मालक आणि भाडेकरूंनी राहण्यासाठी अतिधोकादायक झालेले वाडे असतानाही तो सोडण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे महापालिकेची अडचण झाली आहे.
वीज, पाणीजोड तोडण्यात अडचण
धोकादायक असलेले शहरातील ३७ वाडे पाडण्यासाठी तेथील रहिवाशांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या वाड्यांना देण्यात आलेले वीज जोड आणि पाणी पुरवठा जोडणी तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, त्यामध्ये नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्या हक्कांवर गदा येत असल्याने महापालिकेला त्याची अंमलबजावणी करणे अवघड होत आहे. त्यामुळे पोलिसांची मदत घेत धोकादायक वाडे रिकामे करून घेण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.
रविवार पेठेत धोकादायक वाडे जास्त
शहरातील रविवार पेठेत सध्या सर्वाधिक धोकादायक वाडे असून, त्यांची संख्या ९ इतकी आहे. भवानी पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडी पेठ येथे प्रत्येकी पाच, बुधवार पेठेत चार, नाना पेठेत तीन, सदाशिव आणि गुरुवार पेठेत प्रत्येकी दोन आणि शनिवार पेठेतील एका वाड्याचा समावेश अतिधोकादायक वाड्यांमध्ये आहे. महापालिकेचे अधिक्षक अभियंता राजेश बनकर म्हणाले, राहण्यासाठी धोकादायक झालेले ३७ वाडे रिकामे करण्यास महापालिकेने सांगितले आहे. मात्र, याला विरोध होत असल्याने पोलिसांची मदत यासाठी घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. आयुक्तांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात वाडे रिकामे केले जातील.