पुणे : शहरात ५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुणे महापालिकेकडून यंदाच्या पावसाळ्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्येकी दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी एकूण दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘विकासकामांच्या नावाखाली जुनी आणि ऐतिहासिक झाडे तोडण्यास परवानगी देता कामा नये,’ अशी भूमिका भिमाले यांनी स्पष्ट केली. ‘शंभर, दीडशे किंवा दोनशे वर्षांपूर्वीची झाडे जतन करणे ही महापालिकेची जबाबदारी असून, विकासकामे थांबली तरी चालतील, मात्र अशा झाडांची तोड होऊ नये,’ असे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘महापालिकेच्या अंदाजपत्रकात शहरात ५० लाख झाडे लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवडीची व्यापक मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेत देशी वृक्षप्रजातींना प्राधान्य दिले जाणार असून, शहरातील टेकड्या, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाईल,’ असे भिमाले यांनी सांगितले.
