पुणे : ‘पावसाळ्यामुळे शहरातील अनेक भागांत सध्या गढूळ पाण्याचा पुरवठा हाेत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरीकांनी पाणी उकळून आणि गाळून वापरावे,’ असे आवाहन महापालिकेने केले आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये येणाऱ्या कच्च्या पाण्याच्या गढूळतेत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची गढूळता प्रकल्पाच्या निर्धारित शुद्धीकरण क्षमतेपेक्षा अधिक असल्याने ती पूर्णपणे नियंत्रित करणे सध्या शक्य होत नाही,’ असा दावा महापालिकेने केला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे गढूळ पाण्याचे प्रमाण वाढले आहे.
‘शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या दाेन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा हाेत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून वितरित करण्यात येणारे पाणी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून पूर्णपणे निर्जंतुकीकरण करूनच नागरिकांना पुरविण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये कोणतेही रोगजनक जिवाणू राहणार नाहीत, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता पाणीपुरवठा विभागामार्फत घेण्यात येत आहे,’ असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.
‘पिण्याच्या पाण्याची गढूळता वाढलेली असल्याने नागरिकांनी खबरदारी म्हणून पिण्याचे पाणी काही काळ स्थिर ठेवून त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुरटी फिरवून गढूळ कण तळाशी बसू द्यावेत. त्यानंतर वरचे स्वच्छ पाणी स्वच्छ कापडाने, योग्य फिल्टरद्वारे गाळून उकळूनच पिण्यासाठी वापरावे,’ असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले. ‘महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना दिल्या जाणाऱ्या पाण्यावर केवळ निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया केली जाते. त्या भागात जलशुद्धीकरण (फिल्टर) प्रकल्प उपलब्ध नसल्यामुळे संबंधित नागरिकांनी पिण्याचे पाणी आवश्यकतेनुसार तुरटीचा वापर करून गढूळता कमी करावी, त्यानंतर ते गाळून व उकळूनच वापरावे,’ असेही आवाहन महापालिकेने केले आहे.
भामा आसखेड मधून गढूळ आणि पिवळे पाणी
शहराचा पूर्व भाग अशी ओळख असलेल्या वडगाव शेरी नगर रोड येरवडा या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने भामा आसखेड धरणातून पाणी आणले आहे. या परिसराचा वाढत असलेला विस्तार आणि पाण्याची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने भामा आसखेड धरणातून जलवाहिनी टाकून हे पाणी आणले आहे. हे पाणी पिवळे आणि गढूळ येत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांकडून केली जात आहे. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारचे पिवळे पाणी येत असल्याने नागरिकांना त्रास झाल्याची तक्रार महापालिकेवर आली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी शक्यतो उकळून आणि गाळूनच प्यावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
