पुणे : शहरात अनधिकृत पद्धतीने हवेतून टाकण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर केबल्स’वर (ओएफसी) महापालिकेच्या विद्युत विभागाकडून बुधवारपासून कारवाई करण्यास सुरुवात झाली. बुधवारी दिवसभरामध्ये दोन ट्रक भरतील एवढ्या केबल्स तोडण्यात आल्या. दरम्यान, अशी कारवाई आठवड्याला विविध भागांत करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

इंटरनेट, केबल आणि ‘डीटीएच’ पुरवठादारांकडून शहरात सर्रास अनधिकृत ‘ओव्हरहेड केबल’ (उंचावरून टाकलेल्या केबल) टाकल्या जात आहेत. अनेक ठिकाणी या केबल तुटून पादचारी आणि वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. उड्डाणपूल, छोटेमोठे वृक्ष, पथदिवे, सिग्नल, बसथांब्यांसह खासगी, सरकारी इमारती, घरांवरून अनधिकृत केबलचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकारच्या केबल्सवर तातडीने कारवाई करावी, अशी सूचना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी विद्युत विभागाला केली होती. त्यानुसार सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी परिसरातील अनधिकृत केबल्सवर बुधवारी कारवाई करण्यात आली.

स्थायी समितीचे अध्यक्ष भिमाले, विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सोमनाथ बनकर, अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश कालेकर यांच्या उपस्थितीत सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटीसमोरील अनधिकृत केबल जाळे काढण्यास सुरुवात झाली. यानंतर पुष्प मंगल कार्यालय, उत्सव इमारत परिसर, राजर्षी शाहू महाराज सोसायटी, पुण्याईनगर, धनकवडी या परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दहा किलोमीटर अंतराच्या दोन ट्रक अनधिकृत केबल काढण्यात आल्या, असे विद्युत विभागाच्या प्रमुख मनिषा शेकटकर यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिका आणि पोलिसांच्या सीसीटीव्ही केबल्सवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाईनंतर परिसरातील मोबाईल नेटकवर्क आणि इंटरनेटवरही कोणताही परिणाम झाला नाही. कारवाई करण्यासाठी ठोस धोरण हाती घ्यावे लागणार असून स्थायी समितीच्या पुढील बैठकीत ते निश्चित केले जाणार आहे, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

अनधिकृत केबलच्या जाळ्यामुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होतो, तसेच महापालिकेचा महसूलही बुडतो. ही बाब लक्षात घेऊन अनधिकृत केबलविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. संपूर्ण शहरामध्ये या कारवाईला वेग देण्यात येणार आहे- श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका