पुणे : शहराचा वाढत असलेला विस्तार आणि लोकसंख्येत होणारी वाढ यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने आवश्यक ती उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे. महापालिकेने नव्या निवासी, व्यावसायिक आणि कार्यालयीन इमारतींमध्ये प्रत्येक टॉयलेट किंवा बाथरूममध्ये स्वतंत्र युरिनल (लघुशंका पात्र) बसविणे बंधनकारक करावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

नगरसेविका कोमल नवले आणि जयश्री भूमकर यांनी महिला बालकल्याण समितीसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. समितीच्या बैठकीत यावर सकारात्मक चर्चा झाली. पाण्याची बचत करण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो अशी सकारात्मक चर्चा या विषयावर झाल्यानंतर हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील आठवड्यात यावर अभिप्राय येणे अपेक्षित असून, त्यानंतर हा विषय मान्य करुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे पाठविला जाणार आहे.

शहरातील अनेक घरांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये लघुशंकेसाठी देखील फ्लशयुक्त कमोडचा सर्रासपणे वापर केला जातो. प्रत्येक फ्लशमागे साधारण ५ ते १० लिटर पाणी खर्च होत असल्याने सर्वसाधारणपणे एका कुटुंबात दररोज १०० ते १५० लिटर पाणी हे केवळ फ्लशसाठीच वापरले जाते. शहरातील लाखो नागरिकांचा विचार करता, हा पाण्याचा मोठ्या प्रमाणावरील अपव्यय आहे. त्यामुळे पाणीबचतीसाठी आवश्यक उपाय करणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने होणारे नागरीकरण, मोठ्या प्रमाणावर उभारले जाणारे निवासी व व्यावसायिक प्रकल्प आणि पिण्याच्या पाण्याची वाढत असलेली मागणी यामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बांधकाम नियोजनाच्या टप्प्यातच पाणी बचतीचे उपाय अनिवार्य करण्याची गरज असल्याचे महिला बाल कल्याण समितीकडे देण्यात आलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

पुणे महापालिका हद्दीतील सर्व नवीन निवासी, व्यावसायिक आणि कार्यालयीन बांधकामांना परवानगी देताना प्रत्येक संबंधित टॉयलेट किंवा बाथरूममध्ये स्वतंत्र युरिनल बसविण्याची अट घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होईल, असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे.

महिला, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष अल्पना वरपे म्हणाल्या, शहराची वाढणारी लोकसंख्या आणि उपलब्ध होणारे पाणी याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पाणीबचतीसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी सदस्यांनी नवीन इमारतींमध्ये स्वतंत्र युरिनल बसविणे सक्तीचे करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तो अभिप्रायासाठी पाठविला आहे.