पुणे : महापालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. १५ पैकी १३ समित्यांची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार असून, दोन प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. १३ पैकी १२ समित्यांचे अध्यक्षपद भाजपला मिळणार असून, एका समितीवर काँग्रेसचा अध्यक्ष असणार आहे.
प्रभाग समित्यांच्या रचनेत हस्तक्षेप करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीला ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद दिले आहे. ढोले पाटील रोड आणि येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनाने १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना केली आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेत पक्षीय बलाबलानुसार १४ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व निर्माण होणार आहे, तर काँग्रेसला एक प्रभाग समिती मिळणार होती. यामध्ये महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला एकही प्रभाग समिती मिळणार नव्हती.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने ७ एप्रिल रोजी पालिकेला दिले. पण, प्रशासनाचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे या दोन क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणुका स्थगित कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नीलेश निकम यांनी केली.
या पार्श्वभूमीवर नगरसचिव कार्यालयाकडे प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये १३ प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणुक बिनविरोध झाली. त्यापैकी १२ जागा भाजपला तर १ प्रभाग समितीचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. तर, ढोले पाटील रोड प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला.
दोन प्रभाग समित्यासाठी होणार निवडणूक
येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीसाठी भाजपच्या कविता गलांडे आणि काँग्रेसच्या विशाल मलके यांनी तर ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या सुरेखा कवडे आणि काँग्रेसच्या वैशाली भालेराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणूक येत्या २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बिनविरोध निवड झालेले प्रभाग समिती अध्यक्ष
नगर रोड वाघोली – अनिल सातव
छत्रपती शिवाजीनगर घोले रोड – अमृता म्हेत्रे
औंध बाणेर – रोहिणी चिमटे
कोथरूड बावधन – वासंती जाधव
वारजे कर्वेनगर – मंजूश्री खर्डेकर
सिंहगड रोड – सचिन मोरे
धनकवडी कात्रज आंबेगाव – प्रतिभा चोरगे
कोंढवा उंड्री – रंजना टिळेकर
हडपसर मांजरी – प्रशांत उर्फ मामा तुपे
बिबवेवाडी – मनीषा चोरबेले
कसबा पेठ – उज्वला यादव
विश्रामबागवाडा – राघवेंद्र मानकर (वरील सर्व अध्यक्ष भाजप)
वानवडी – साहील केदारी (काँग्रेस)
