पुणे : रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या बेवारस वाहनांमुळे विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होणार असल्याने बेवारस वाहने हटविण्यात यावीत, असे आदेश महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दिले आहेत. अतिक्रमण विभागाकडून या वाहनांवर नोटीस चिकटविण्यात आली असून वाहने तातडीने न हटविल्यास ती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवामुळे सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे, सजावटी पाहण्यासाठी शहर, उपनगराबरोबरच बाहेरील शहरातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मध्यवर्ती भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. गणेशोत्सवापूर्वी महापालिकेने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली बेवारस वाहने हटविण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली होती.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार; पवना धरण १०० टक्के भरले
या मोहिमेत २२ वाहने जप्त करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा रस्त्याच्या कडेला, पादचारी मार्गावर मोटारी, दुचाकी आणि तीन चाकी वाहने उभी करण्यात आली आहेत. त्याचा अडथळा विसर्जन मिरवणुकीला होणार असल्याने महापालिकेने प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून मालकांचा पत्ता शोधत त्यांना नोटीस बजावली आहे.
हेही वाचा : पुणे: भाविकांचा मेट्रोकडे ओढा! रात्री उशिराच्या सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद
रस्त्याकडेची वाहने तातडीने न हटविल्यास ती जप्त करण्यात येतील, असा इशारा अतिक्रमण विभागाकडून देण्यात आला आहे. लक्ष्मी रस्ता, नाना पेठ, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणावर बेवारस वाहने उभी असल्याचे महापालिकेने केलेल्या पाहणीवेळीही आढळून आले होते.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation warns remove abandoned vehicles from roads immediately ganesh visarjan 2023 pune print news apk 13 css