पुणे : महापालिका पिण्यासाठी खडकवासला धरणातून पाणी उचलते. मात्र त्याबदल्यात असलेली पाणीपट्टी वेळेवर भरत नाही. त्यामुळे महापालिकेकडे तब्बल ९३२ कोटी रुपयांची पाणीपट्टीची थकबाकी शिल्लक आहे. ही ‘थकबाकी तातडीने भरा, अन्यथा लवकरच पाणी कपात करु’ अशी नोटीस जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पाठविली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेलाही १२२ कोटी रुपयांची थकबाकी भरण्याचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पुणे महापालिकेला ११.६० अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा मंजूर आहे. मात्र ठरवून दिलेल्या पाण्यापेक्षा महापालिका अधिक पाणी धरणातून उचलत असल्याचे वारंवार समोर आले आहे. पुणे महापालिकेने २०२४- २५ मध्ये प्रत्यक्ष पाणी वापर २०.४४ टीएमसी इतका झाला आहे. महापालिकेला मंजूर करण्यात आलेल्या पाण्याच्या कोट्यापेक्षा महापालिकेने गेले वर्षभरात तब्बल ८.८४ टीएमसी इतका पाणीसाठा अतिरिक्त वापर केल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे ठोक जलदराच्या २०२२ च्या आदेशातील तरतुदीनुसार, नियमबाह्य व मापदंडापेक्षा अतिरिक्त पाणी वापरावर दंडनीय आकारणी करण्यात आली आहे. यामध्ये १०० टक्के पाणीवापरासाठी निश्चित करण्यात आलेले दर आकारण्यात येतात. १०० ते १२५ टक्के पाणीवापरासाठी निश्चित दराच्या दीडपट तर १२५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीवापर झाल्यास तीन पट दर आकारण्याची तरतूद आहे.
त्यानुसार जलसंपदा विभाग महापालिकेला वाढीव पाणीवापराबद्दल पाणीपट्टी लावते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून महापालिका पाणीपट्टी भरत नाही. त्यामुळे ही थकबाकी वाढून ९३२ कोटींवर पोहोचली आहे. गेल्या नोव्हेंबर, डिसेंबर अखेरीस १९ कोटी ७५ लाख रुपये इतकी रक्कम महापालिकेने थकबाकीपोटी भरल्याचे जलसंपदा विभागाने नोटिशीमध्ये म्हटले आहे.
महापालिकेने तातडीने ही थकबाकी भरावी, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे. महापालिकेच्या जादा पाणी वापरामुळे जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी देणे जिकरीचे होत आहे. पुणे महानगरपालिकेचा २०२५-२६ साठीचा वार्षिक मंजूर पाणी कोटा पूर्ण होत आला आहे. हा पाणी पुरवठा संपुष्टात आला असून आता लवकरच पाणीपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येईल, असाही इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महापालिकेवर पाणी कपात करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख म्हणाले, पुणे महानगरपालिकेचा मंजूर पाणी कोट्याचा वापर पूर्ण झाला आहे. पालिकेकडे ९५२ कोटींपैकी १९ कोटी रुपयांची काही रक्कम गेल्या दोन महिन्यापूर्वी भरण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून पाणीपट्टी वसुलीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेला नोटीस देण्यात आली आहे. रक्कम न भरल्यास पाणी दिले जाणार नाही.
