पुणे : पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पाणीकपातीच्या काळात शहरातील ‘वॉशिंग सेंटर’ बंद ठेवण्यासह जलतरण तलाव, खासगी उद्याने, बांधकामे आणि रस्त्यांच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दोन वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येणार असून, तिसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाने नव्याने तयार केलेल्या नियमावलीवर चर्चा झाली. महापालिकेने धरणांतील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी या संदर्भात कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. पाणीपुरवठा विभागासह क्षेत्रीय कार्यालये, उद्यान, बांधकाम विकास, भवन रचना आणि पथ विभागांवर या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटरवर निर्बंध

पाणीकपातीच्या दिवशी वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव केंद्र सुरू असल्याचे आढळल्यास दहा हजार रुपयांचा दंड घेतला जाणार आहे. खासगी बोअरवेल किंवा विहिरींचे पाणी वापरणाऱ्या केंद्रांना रविवार, मंगळवार आणि गुरुवार असे आठवड्यातील तीन दिवस सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. खासगी, सार्वजनिक जलतरण तलाव आणि खासगी उद्यानांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियम मोडल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

बांधकामांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची सक्ती

शहरातील इमारतींची बांधकामे, रस्त्यांची कामे आणि रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांसाठी महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरता येणार नाही. या कामांसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी किंवा बोअरवेल, विहिरींच्या पाण्याचा वापर करावा लागणार आहे.

अनधिकृत नळजोडांवर होणार कारवाई

अनधिकृत नळजोड आढळल्यास तो तत्काळ बंद करून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. पुन्हा अनधिकृत नळजोड घेतल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. पाण्याच्या टाक्या भरून वाहत असल्यास एक हजार रुपये, तर टँकरमधून पाण्याची गळती होत असल्यास दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. पाणीपुरवठा वाहिन्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला अहवाल

महापालिकेने काढलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नियुक्त करावा, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पाणीपुरवठा विभागाला सादर करावा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त कौर यांनी दिले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.