scorecardresearch

पुण्यात सुशोभीकरणासाठी घेणार उद्योजक, बँकांची मदत; विक्रम कुमार यांची माहिती

जानेवारी महिन्यात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या तयारी निमित्त शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार असून त्यासाठी उद्योजक आणि बँकांची मदत घेतली जाणार आहे.

पुण्यात सुशोभीकरणासाठी घेणार उद्योजक, बँकांची मदत; विक्रम कुमार यांची माहिती
पुणे महानगरपालिका

जानेवारी महिन्यात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या तयारी निमित्त शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार असून त्यासाठी उद्योजक आणि बँकांची मदत घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात मोठ्या बँका आणि उद्योजकांची बैठक येत्या काही दिवसांत आयोजित करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.

हेही वाचा >>>पुणे: नवले पूल परिसरात अतिक्रमणांवर हातोडा?

जी-२० राष्ट्र समूहाच्या परिषदेचे आयोजन भारतासह तीन देशांत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे आणि औरंगाबादला या परिषदेतील सत्रांच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. जानेवारी महिन्यात पुण्यात परिषद होणार आहे. जी-२० परिषदेचे सदस्य शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळी भेटी देणार आहेत. परिषदेसाठी २० देशांचे २०० हून अधिक प्रतिनिधी पुण्यात उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहर सुशोभीकरणावर आणि रस्ते दुरुस्तीवर भर दिला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबरच आता बँका आणि उद्योजकांचीही मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.

हेही वाचा >>>‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख 

या परिषदेच्या निमित्ताने राज्याच्या अपर मुख्य सचिवांनी महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. शहरातील साठ चौक आणि वाहतूक बेटांचे कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. साठ पैकी ५२ ठिकाणची कामे सुरू झाली आहेत. ऐतिहासिक शनिवार वाड्यातील ध्वनिप्रकाश योजनेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तर नदीकाठ सुधार योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यालाही महापालिकेने प्राधान्य दिले आहे. या योजनेच्या माहितीसाठी औंध येथील सयाजीराव गायकवाड भवनामध्ये योजनेची माहिती, छायाचित्र आणि अन्य सादरीकरण पाहावयास मिळणार असून ही कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. विमानतळ ते बैठकीच्या मार्गावरील रस्ता दुभाजक, उद्याने, प्रकाशव्यवस्थांची कामे करण्यासाठी येत्या दोन दिवसांत संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 11:19 IST

संबंधित बातम्या