पुणे : शिवाजीनगर येथी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत (मनपा भवन) एका महिलेने महिला उपायुक्तांच्या दालनात घुसून त्यांना शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (८ एप्रिल) दुपारी घडली. या प्रकारामुळे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिका कर्मचारी राकेश विटकर (५३) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक, क्रीडा व सुरक्षा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत या आपल्या दालनात शासकीय कामकाज पाहत होत्या. यावेळी आरोपी महिलेने पूर्वपरवानगीशिवाय राऊत यांच्या दालनात प्रवेश केला. दालनात शिरल्यानंतर आरोपीने उपायुक्तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मोठ्या आवाजात आरडाओरडा आणि अरेरावीची भाषा वापरत तिने कार्यालयातील शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या गोंधळामुळे विभागातील इतर कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाली आणि काही काळ कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.
गोंधळ सुरू असतानाच, आरोपी महिलेने आपल्या मोबाईलवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला. हा व्हिडिओ समाजमध्यमावर प्रसारित करून महिला अधिकाऱ्याची आणि महापालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
