पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सून सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालायने सशर्त परवानगी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, भाषण, घोषणाबाजी करु नयेत, असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली हे शनिवारी (२७ डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच वर्चस्वाच्या वादातून गणेश विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा नाना पेठेत खून केला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी आयुष कोमकर याचा खून करण्यात आला होता. वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर हा बंडू आंदेकरचा जावई आहे.
मुलगा वनराज याच्या खुनाचा सूड उगविण्यासाठी आंदेकरने स्वत:चा नातू आयुष याचा खून घडवून आणला होता. याप्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०), माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, तिघे रा डोके तालमीजवळ, नाना पेठ)यांच्यासह १५ आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. निवडणूक कार्यक्रमानुसार ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर यांच्या वतीने ॲड. मिथून चव्हाण यांनी न्यायालयात केला होता.‘ निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे’, असे नमूद करुन विशेष न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक ठिकाणी भाषण करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नाना पेठेतील जामिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी बंडू आंदेकरला धुळे कारागृहातून ताब्यात घेऊन समर्थ पाेलिसांनी नुकतीच अटक केली होती. याप्रकरणी आंदेकरला न्यायालययाने पोलीस कोठडी सुनावली होती.
