पुणे : पुणे महानगरपालिकेसह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यापैकी बहुतांश महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वात अधिक जागा जिंकल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकांची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संपत्ती, त्यांच्याकडे असलेली वाहने, मालमत्ता, शिक्षण , त्यांच्यामागे असलेली घराणेशाहीचा वारसा अनेक गोष्टींनी ही निवडणूक चर्चेची ठरली.

पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी झालेली निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे ), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) , मनसे, वंचित बहुजन, आम आदमी पार्टी, अशा सर्वच राजकीय पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात तुल्यबळ उमेदवार उतरविले होते. भाजपाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) च्या मदतीने पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा जिंकून सर्वात अधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून पहिला क्रमांक पटकाविला. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने २७, काँग्रेसने १५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ३ तर शिवसेना (ठाकरे) पक्षाला एक जागा मिळाली.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई, प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणूक लढविणाऱ्या राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांनी केला आहे. २५ ब या गटातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे मानकर हे तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. या प्रभागातील चारही जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.

यामध्ये दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, दिवंगत आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक तसेच स्वप्नाली पंडित यांचा समावेश आहे. सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे राघवेंद्र मानकर यांच्या नावावर कोणतेही वाहन नाही. त्यांच्या नावावर एक ॲम्बुलन्स असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येण्याची कामगिरी भाजपचे राघवेंद्र मानकर यांनी केली आहे. ते पहिल्यांदाच महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आले आहे. शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई, या प्रभाग क्रमांक २५ मध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी ३१ हजार ९८१ इतकी मते मानकर यांना मिळाली आहेत. तब्बल ७९.३४ टक्के मते मिळवित त्यांनी यश मिळविले आहे. मानकर यांच्या पाठोपाठ पुणे महापालिकेच्या वारजे पॉप्युलर नगर प्रभाग ३२-ब मधून भाजपचे उमेदवार भारतभूषण बराटे यांना २५ हजारांचे, तर खराडी- वाघोली प्रभाग ४-ब मधून रत्नमाला सातव यांना २३ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.

या मताधिक्याबाबत प्रतिक्रिया देताना बाप्पू मानकर म्हणाले, “माझ्या प्रभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उभे केलेले भाजपाचे संघटन, पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम, मित्र परिवाराने प्रचारात केलेले काम, आणि नागरिकांसाठी कामांमध्ये ठेवलेले सातत्य यामुळे नागरिकांकडून मतांचा भरभरून आशीर्वाद मिळाला. राज्यात सर्वाधिक मताधिक्य हा केवळ निवडणुकीचा निकाल आहे. शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई प्रभागाला पुण्यासह राज्यात सर्वाधिक विकसित करण्याचा प्रयत्न आहे.”