पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे काही प्रभागांमध्ये माजी पदाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. काही प्रभागांमध्ये चिठ्ठीद्वारे महिला आरक्षण पडल्याने यापूर्वी याच प्रभागातून आरक्षित जागेवरून निवडून आलेल्यांना आता खुल्या गटातून निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह अविनाश बागवे आणि इतर माजी नगरसेवकांना याचा फटका बसणार आहे.
आरपीआयचे नेते आणि माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांच्या प्रभाग क्रमांक २ फुलेनगर-नागपूर चाळ येथे अनुसूचित जाती (महिला), इतर मागासवर्ग, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे धेंडे यांना निवडणूक लढवायची झाल्यास सर्वसाधारण गटातून लढावे लागणार आहे.
प्रभाग क्रमांक २१ मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क हा प्रभाग इतर मागासवर्ग (महिला) असा राखीव झाला आहे. या प्रभागात माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांची अडचण झाली असून, त्यांना खुल्या गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे.
शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग अशी ओळख असलेल्या कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम प्रभाग क्रमांक २४ मध्ये अनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण पडले नाही.
यामुळे काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका पल्लवी जावळे यांना सर्वसाधारण महिलांमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. या निवडणुकीत करण्यात आलेल्या प्रभागरचनेमध्ये या भागातील अनुसूचित जातीच्या मतदारांचा भाग तोडून दुसऱ्या भागाला जोडल्याने या प्रभागातील एससीचे आरक्षण दुसऱ्या प्रभागात गेले आहे.
प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडी या प्रभागात एकच जागा खुली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे आणि सनी निम्हण यांना उमेदवारी मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे.
सूस-बाणेर-पाषण प्रभाग क्रमांक ९ मध्ये इतर मागासवर्ग महिला आरक्षण पडले नाही. त्यामुळे माजी नगरसेवक ज्याेती कळमकर यांच्या जागी त्यांचे पती गणेश कळमकर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवामध्ये सर्वसाधारणसाठी एक जागा असल्यामुळे माजी नगरसेवक उमेश गायकवाड, माजी उपमहापौर बंडू गायकवाड, माजी नगरसेवक बाबू वागस्कर यांना एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे.
प्रभाग क्रमांक ३२ वारजे-पॉप्युलरनगरमध्ये एकच जागा खुली असल्यामुळे माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
कासेवाडी डायस प्लॉट प्रभाग क्रमांक २२ मध्ये अनुसूचित जाती (महिला) आरक्षण पडल्याने काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना आरक्षित जागेऐवजी आता खुल्या गटातून निवडणूक लढवावी लागणार असल्याची शक्यता आहे.
यंदाही बिडकर विरुद्ध धंगेकर लढत?
कसबा गणपती-कमला नेहरू रुग्णालय प्रभाग क्रमांक २४ मध्ये माजी सभागृह नेते गणेश बिडकर हे सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढणार आहेत. याच प्रभागातून माजी आमदार रवींद्र धंगेकर हे मैदानात न उतरता त्यांचे चिरंजीव प्रणव हे खुल्या जागेतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत झालेली बिडकर विरुद्ध धंगेकर अशी लढत यंदाही होण्याची शक्यता आहे. प्रभाग २३ रविवार पेठ-नाना पेठमधून ओबीसी महिला या आरक्षित जागेवरून धंगेकर यांच्या पत्नी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
