पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीवर अनेक तक्रारी आल्या आहेत. यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी आणि नागरिकांना यावर त्रुटी नोंदविता याव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने सहा दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

३ डिसेंबरपर्यंत नागरिकांना हरकती, तक्रारी नोंदविता येणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळपर्यंत मतदारयादीवर ३ हजार ३४३ हरकती, त्रुटी नोंदविण्यात आल्या.

पुणे महापालिकेची आगामी निवडणूक ४१ प्रभागांमध्ये होणार आहे. या प्रभागांची प्रारूप मतदारयादी महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. या मतदारयादीवर हरकती आणि तक्रारी नोंदविण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या यादीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले असून, दररोज येणाऱ्या तक्रारींची संख्या वाढत आहे.

मतदारयादीत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने केल्या आहेत. यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, ३ डिसेंबरपर्यंत नागरिकांना हरकती, त्रुटी नोंदविता येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी मुदतवाढीचे आदेश काढले आहेत. गेल्या आठवड्यात महापालिकेने प्रारूप मतदारयादी जाहीर केली होती. मात्र, या यादीत अनेक मतदारांची नावे दुबार झाली असून, काही मतदारांची नावे केवळ आजूबाजूच्या प्रभागात नव्हे, तर दुसऱ्याच विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील याद्यांमध्ये आल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

मतदारयादीत मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वत:हून याद्यांची तपासणी सुरू केली आहे. मतदारयादीचे प्रभागनिहाय विभाजन करताना वापरण्यात आलेल्या संगणकीय यंत्रणेमुळे याद्यांची विभागणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रारुप मतदार यादीवर हरकत नाेंदविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून केली जात हाेती. राज्य निवडणूक आयोगाकडेदेखील राज्यातील अनेक महापालिकेच्या मतदारयाद्याबाबत तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेत निवडणूक आयोगाने मतदारयादीच्या कार्यक्रमात बदल केला आहे.

मतदारयादीवर हरकती, त्रुटी नाेंदविण्याची मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर अंतिम मतदारयादी जाहीर करण्याची मुदत पाच दिवसांनी वाढविली आहे. मतदान केंद्रांची यादी १५ डिसेंबर राेजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच, मतदान केंद्रनिहाय यादी २२ डिसेंबर राेजी जाहीर केली जाणार आहे.

‘कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बिनचूक काम करावे’

मतदारयाद्यांतील त्रुटीबाबत येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी महापालिकेतील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत ‘सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बिनचूक काम करावे,’ अशा सूचना राम यांनी दिल्या. महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराचे मताधिक्य अत्यंत कमी असते. त्यामुळे लक्ष केंद्रित करून मतदारयादी त्रुटीमुक्त कशी होईल, याकडे लक्ष द्यावे,’ असे राम यांनी बैठकीत स्पष्ट केले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले,

महापालिका प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन तर काही भागात महापालिकेते अधिकारी स्वत:हून चौकशी करून चुकीची नावे रद्द करत आहेत. ज्या मतदारांची नावे इतर प्रभागांत गेली आहेत. त्याची शहानिशा सुरू आहे. त्रुटीमुक्त मतदारयादी तयार केली जाईल.