पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक प्रचार सुरू केला असताना, भाजपने त्यांना थोपविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी रणांगणात उतरवले; तसेच प्रचाराच्या रणनीतीत बदल केल्याने भाजपने बहुमत मिळवित ‘शतप्रतिशत’ सत्ता मिळविली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र येत दिलेली लढत अपयशी ठरली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार, भाजपवर उघडपणे केलेल्या टीकेला पुणेकरांनी प्रतिसाद न दिल्याने दोन्ही ‘राष्ट्रवादी’च्या पदरी निराशा आली.

काँग्रेसने शिवसेना (ठाकरे) पक्षाबरोबर आघाडी केल्यावर शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) बरोबर घेतल्याचा काँग्रेसला ‘हात’भार लागला. मात्र, काँग्रेसने या दोन्ही पक्षांना ‘हात’ दाखवल्याने त्यांना यश मिळू शकले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपबरोबर युती होणार, या विश्वासावर असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला ऐनवेळी उमेदवार उभे करावे लागल्याने या पक्षाच्या धनुष्याचे बाण भात्यातच राहिले. महापालिकेच्या १६५ जागांपैकी भाजपचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे हे दोन जण बिनविरोध निवडून आले. उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भरभरून साथ दिल्याने भाजपने पुण्यावरील सत्ता कायम राखली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार निश्चित झाल्यानंतर सलग दोन आठवडे पुण्यात ठाण मांडले होते. भाजपची उमेदवारी यादी जाहीर होताच त्यांनी भाजपमधील नाराजांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची खेळी खेळली. त्यानंतर त्यांनी आक्रमकपणे प्रचाराला सुरुवात केली. भाजपच्या प्रचाराची जबाबदारी असलेले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना त्यांनी लक्ष्य केले. त्यानंतर ‘७० हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर सत्तेत आहे’ असे वक्तव्य करून मतदारांना संभ्रमात पाडले. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मेट्रो आणि बससेवा मोफत देण्याची घोषणा करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सोपी वाटणारी निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक झाली. मात्र, अजित पवार यांच्या प्रचाराचा मतदारांवर परिणाम झाला नसल्याचे निकालावरून दिसून आले.

भाजपला रणनीती बदलल्याचा फायदा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोप, टीका-टिप्पणी सुरू केली असताना भाजपचे स्थानिक पदाधिकारी गोंधळात पडले. पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यानंतर भाजपने निवडणुकीची रणनीती बदलली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरसभा घेऊन अजित पवार यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या इच्छुकांशी संपर्क साधून त्या प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे नाराजही कामाला लागल्याने चित्र बदलले.

गुन्हेगारांना उमेदवारी ‘राष्ट्रवादी’ला भोवली

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेत भाजपपुढे आव्हान उभे केले. उमेदवारी देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींनाही उमेदवारी दिली. त्यापैकी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या निवडून आल्या. कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री आणि बापू नायर हे दोघे पराभूत झाले. हा निर्णय पुणेकरांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे मतदारांनी ‘राष्ट्रवादी’ला नाकारल्याने अपेक्षित यश मिळू शकले नाही. उपनगरांमध्ये या पक्षाचे पारंपरिक मतदार असल्याने त्या परिसरात मतदारांनी साथ दिली.

पिंपरी-चिंचवडही पुन्हा भाजपकडे

पुण्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचाराचा धुरळा उडवला. अजित पवार आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात ‘अरे तुरे’पर्यंत वाद झाले. एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. भाजपने या महापालिकेवरील सत्ता कायम राखली. अन्य पक्षांचा निभाव लागला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.