पुणे : दुचाकीस्वार महापालिका कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यूप्रकरणात त्याच्या कुटुंबीयांना ५८ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय लोकअदालतीत घेण्यात आला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. पी. क्षीरसागर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. जी.डोरले आणि ॲड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलने तडजोडीत दावा निकाली काढला. दुचाकीस्वार ५७ वर्षीय महापालिका कर्मचारी ७ जून २०२० रोजी किराणा माल खरेदी करून धानोरी परिसरातून निघाले होते. त्यावेळी रस्त्यात थांबलेल्या एका मोटारचालकाने अचानक दरवाजा उघडला. दरवाज्यावर आदळल्याने दुचाकीस्वार महापालिका कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेतील कर्मचाऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा ९ जून रोजी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. हेही वाचा.पुणे : भिडे पूल आणि शिवणे पूल पुन्हा पाण्याखाली मोटारचालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याने विश्रांतवाडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल केला. महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी नुकसान भरपाईसाठी मोटार अपघात न्यायालयात दावा दाखल केला. ॲड. सुनीता नवले यांच्यामार्फत मोटारचालक आणि विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल करण्यात आला. लोकअदालतीत तडजोडीत दावा निकाली काढण्यात आला.