राज्यातील महत्वाची महापालिका असलेल्या पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक आज (मंगळवार) सादर करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी मागील वर्षापेक्षा सुमारे ४२ कोटी रुपयांना कात्री लावत २०१८-१९ यावर्षीचे ५ हजार ८७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक  सर्वसाधारण सभेत सादर केले. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून सद्य स्थितीला २३ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. या कामासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पावसाच्या पाण्याचा पुन्हा उपयोग व्हावा यासाठी शहरातील सोसायट्यांना रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यासाठी विशेष अनुदान दिले जाणार आहे.

 

सन २०१८ -१९ च्या अंदाजपत्रकाची ठळक वैशिष्ठये

केंद्र शासनाच्या मदतीने करण्यात येणार्‍या मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. या कामाला अधिक गती देण्यात येणार असून लवकरच मैला पाणी प्रक्रिया केंद्रांची कामे सुरू करण्यात येतील. यासोबतच मुळा-मुठा नदीच्या सुमारे ४४ किमी लांबीच्या काठावरील भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याकामाचा आराखडा तयार असून या कामाचा प्रारंभ लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.

– स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील काही भागात सायकल योजना राबविली जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्या पार्श्वभूमीवर सायकलसाठी पूरक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ५५ कोटींची तरतूद

– रामटेकडी येथील कचरा प्रकल्पामध्ये नव्याने ७५० मेट्रिक टनाचा कचरा प्रकल्प उभारला जाणार. बायो वेस्ट, ई वेस्ट आणि प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्पासाठी १ कोटींची विशेष तरतूद

– स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या निधीतून ३९५ कोटींचा निधी उभारला गेला. त्यातील १७४ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. यंदा या कामासाठी ५० कोटीची तरतूद करण्यात आली.

– शहरातील स्वच्छतागृहे दिवसातून दोनदा साफ करण्यासाठी ८ कोटींची तरतूद

– स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ प्रभाग योजना या स्पर्धेसाठी ४ कोटींची तरतूद

– भामा आसखेड प्रकल्पातून पूर्वेच्या उपनगर भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी ८७ कोटींची तरतूद

पुणे शहरातील विविध भागात महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक आणि नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी २७ कोटींची तरतूद

– शहरातील महापालिकेच्या सर्व इमारतीवर सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहे. यातून ८२५ किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. या कामासाठी ६ कोटीं ७० लाखांची तरतूद

– महापालिकेच्या सर्व शाळांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ८ कोटींची तरतूद

– चित्तरंजन वाटिका येथे ट्रॅफिक एज्युकेशन पार्क उभारण्यात येणार असून याद्वारे विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले जाणार आहे. या करिता ५० लाखांची विशेष तरतूद

– शहरातील सोसायट्यांना रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यासाठी विशेष अनुदान देणार.

– शहरातील आठ ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविली जाणार आहे. यासाठी ७०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातून १ लाख २२ हजार घरे होणार असून यंदा या प्रकल्पास २९ कोटी २० लाखांची तरतूद.

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी २० कोटींची तरतूद 

सिहंगडावरील छत्रपती राजाराम समाधी आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या नुतानीकरणासाठी अडीच कोटींची तरतूद तर आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक स्मारकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, मनसेचे गटनेते वसंत मोरे, रिपाइंच्या गटनेत्या वाडेकर, एमआयएमच्या गटनेत्या अश्‍विनी लांडगे, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले आदी उपस्थित होते.