पुणे : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शासकीय ताफ्यात मोटार चालकाने शिरण्याचा प्रयत्न केल्याची घटना संचेती चौकात घडली. बेदरकारपणे मोटार चालविणाऱ्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोटार चालकाने मद्य प्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले.

या प्रकरणी एका मोटार चालक तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार ईश्वर भिकुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक फौजदार भिकुले हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते अंगरक्षक आहेत. मोहोळ यांचा ताफा १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचेती चौकातून निघाला होता. संचेती चौकातून ताफा निघाल्यानंतर ताफ्यातील वाहनांनी सायरन वाजवून याबाबतची सूचना वाहनचालकांना दिली. त्या वेळी तेथून निघालेल्या मोटार चालक तरुणाने ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न केला. ताफ्यात अचानक मोटार शिरल्याने अडथळा निर्माण झाला. आदेशाचे उल्लंघन करणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, तसेच मोटार वाहन कायद्यान्वये दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोटार चालक तरुणाला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक काठे तपास करत आहेत.

पुणे शहर परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, राजकीय नेत्यांचा राबता वाढला आहेत. या दौऱ्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त पुरविण्यात येतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, राजकीय नेते उपस्थिती लावतात.