पुणे : गणेशोत्सवानंतर मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली. रविवारी मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी सामिष खवय्यांची गर्दी झाली होती. ‘अधिक मास, श्रावण मास, तसेच ‘गणेशाेत्सवात मटण, मासळी, चिकनला मागणी नव्हती. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर रविवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती.

रविवारी सकाळपासून सामिष खवय्यांनी मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी गर्दी केली होती. आषाढ महिन्यात सामिष खवय्यांकडून मागणी होती. त्यानंतर अधिक मास, श्रावण मास आला. अधिक मास, श्रावण मासात सामिष पदार्थ वर्ज्य मानले जातात. श्रावण महिन्याची सांगता झाल्यानंतर गणेशोत्सवास सुरुवात झाली. गेले तीन महिने सामिष खवय्यांचा हिरमोड झाला होता. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर पितृपक्षास सुरुवात होते. पितृपक्षात सामिष पदार्थांचे सेवन केले जाते. त्यानंतर नवरात्रोत्सवात सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. मटणाचे दर स्थिर राहिले’, अशी माहिती पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

‘गणेशोत्सवानंतर मासळी, मटण, चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. रविवार असल्याने खरेदीसाठी मासळी बाजारात गर्दी झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीच्या मागणीत दीडपट वाढ झाली. पापलेट, रावस या मासळीचे दर तेजीत आहेत. उर्वरित मासळीचे दर स्थिर आहेत. रविवारी गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, नदीतील मासळी ४०० ते ५०० किलो, खाडीतील मासळी २०० ते ३०० किलो, तसेच आंध्र प्रदेशातून १० ते १५ टन रहू, कतला, सीलन या मासळीची आवक झाली,’ असे गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

चिकनच्या दरात किलोमागे २० रुपयांनी वाढ

‘गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकनच्या दरात किलोमागे २० रुपयांनी वाढ झाली. गणेशाेत्सवानंतर रविवार आल्याने चिकनच्या मागणीत मोठी वाढ झाली. इंग्लिश अंड्याचे दर स्थिर राहिले. गावरान अंड्याच्या दरात शेकड्यामागे ४० रुपयांनी वाढ झाली’, असे पुणे शहर बाॅयलर असोशिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.

मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर

पापलेट – ८०० ते २००० रुपये
हलवा – ६०० ते ७०० रुपये
सुरमई – ४०० ते ७०० रुपये
कोळंबी – ७५० ते १४० रुपये
मटण – ८४० रुपये
चिकन – २२० रुपये
गावरान अंडी (डझन) – १५६ रुपये
इंग्लिश अंडी (डझन) – ७८ रुपये